AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..Love U दादा!; रोहित पवार यांची काळजाला भिडणारी पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकात बुडाला आहे. रोहित पवारांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे. दादांचे कार्य, शिस्त आणि जनतेसाठीचे समर्पण यावर प्रकाश टाकणारी ही पोस्ट महाराष्ट्राच्या मनाला भिडली आहे. त्यांच्या निधनावर विश्वास बसत नाही, असे म्हणत रोहित पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..Love U दादा!; रोहित पवार यांची काळजाला भिडणारी पोस्ट
रोहित पवार यांची काळजाला भिडणारी पोस्ट
| Updated on: Jan 30, 2026 | 1:43 PM
Share

राज्यातील अत्यंत कर्तबगार आणि शिस्तप्रिय नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लौकीक होता. उपमुख्यमंत्रीपद सांभाळतानाच अजितदादा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यायचे. इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला द्यायचे. अजितदादांचा दिवस पहाटे पासून सुरू व्हायचा. तो रात्रीपर्यंत चालायचा. दादा सतत कामात मग्न असायचे. कार्यकर्त्यांच्या जनतेच्या गराड्यात असायचे. प्रत्येकाची समस्या तिथल्या तिथेच सोडवण्यावर त्यांचा भर असायचा. अजितदादा कधी थकत नसत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असायची. त्यामुळेच त्यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला शॉक बसला आहे. अजितदादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. राज्यातील प्रत्येक व्यक्ती दादांच्या अकाली एक्झिटने हेलावून गेला आहे. मनातून हलला आहे. अजितदादांचे पुतणे, आमदार रोहित पवार यांनीही अजितदादांच्या आठवणींना जागवणारी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. रोहित पवार यांची पोस्ट काळीज चिरणारी असून डोळ्यात पाणी आणणारी आहे.

रोहित पवार यांची पोस्ट जसच्या तशी…

मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.

पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’

अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.

दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’

दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय…😭 Love U दादा!💔🙏

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.