
महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल तीन ते चार दशके गारूड निर्माण करणाऱ्या अजित पवार यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. काटेवाडीच्या घरी अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अजितदादांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला. एकच वादा, अजितदादा, परत या… परत या… अजितदादा परत या… असा टाहोच कार्यकर्त्यांनी फोडला. अनेकजण धायमोकलून रडत होते. संपूर्ण आसमंतात शोक लहर पसरली होती. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमावच हेलावून गेला होता. आपले दादा आपल्यात नाहीत या भावनेने सर्वच सुन्न झाले होते. त्यानंतर अजितदादा यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं. विधीवत मंत्रोच्चारानंतर दादांना शासकीय सलामी देण्यात आली. त्यानंतर दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि त्यानंतर धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दादांना मुखाग्नी दिला. यावेळी अनेकांचं काळीज हललं. अनेकांचा बांध फुटला. दादा पर्व संपल्याने सर्वच हतबल झाले होते.
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे आणण्यात आले. पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती. “अजितदादा अमर रहे”, “कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रशासनाने कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त तैनात केला होता. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि विविध पक्षांचे दिग्गज नेते आज बारामतीत दाखल झाले होते.
यावेळी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छगन भुजबळ, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, महादेव जानकर आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या शोकसभेच्या वेळी संपूर्ण वातावरण अत्यंत जड झाले होते. पवार कुटुंबाचे सांत्वन करताना आणि श्रद्धांजली वाहताना उपस्थित अनेक नेत्यांना आपले अश्रू अनावर झाले होते.
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले. बारामतीसह ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये आज कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आपल्या कार्यसम्राट नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
बुधवारी सकाळी ८:४५ च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे येत असताना अजित पवारांचे चार्टर्ड विमान बारामती धावपट्टीजवळ कोसळले. या भीषण अपघातात अजित पवारांसह त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि दोन पायलट यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
प्रशासनावरील पकड आणि राजकीय पोकळी आपल्या रोखठोक शैलीसाठी आणि प्रशासनावरील जबरदस्त पकडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक कार्यक्षम प्रशासक आणि सामान्यांचा नेता अशी ओळख असलेले दादा आज अनंतात विलीन झाले आहेत.