
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राज्याचं पावसाळी अधिवेश सुरू असताना तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता, या व्हिडीओमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना यावरून जोरदार राडा देखील झाला होता.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा मागणीचं निवेदन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी सुनील तटकरे यांना दिलं, त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकले, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली, या मारहाणीमध्ये सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं, सूरज चव्हाण यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांचा तडकाफडकी राजीनामा देखील घेण्यात आला होता. मात्र त्यांना महिना भरातच बढती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे, पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र आता या प्रकरणात एक मोठं ट्विस्ट आलं आहे, सूरज चव्हाण यांच्या नव्या नियुक्तीबाबत अजित पवार यांना माहिती नसल्याचं समोर आलं आहे. आपण त्या बैठकीमध्ये नव्हतो, त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याच्याबद्दल माहिती घेतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मते सूरज चव्हाण यांना सरचिटणीस बनवण्याचा निर्णय कोअर ग्रुपने घेतला आहे. तर यावर आपल्याला याबाबत माहिती नसल्याचं विधान अजित पवार यांनी केलं आहे. मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या बैठकीला नव्हतो, मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळी जे खटकलं त्या पद्धतीचा मी निर्णय घेतला. आणि मला ज्या गोष्टी खटकतात त्याबद्दल मी तडका फडकी निर्णय घेत असतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.