
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक आठवडा उलटला आहे. गेल्या बुधवारी (28 जानेवारी) त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यात अजित पवारांचे पीएसओ (PSO) विदीप जाधव, विमानाचे 2 पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचाही समावेश होता. दरम्यान अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. जाधव यांचा 1 कोटींचा अपघात विमा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ या कंपनीचा अपघात विमा घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्या आठवड्यात कंपनीने अपघात विम्याचा दावा मंजूर केला आहे. विदीप जाधव हे 2009 सालच्या तुकडीचे असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. ते 2014 ते 2019 या वर्षांच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते. तर गेल्या काही काळापासू ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्ष म्हणून कार्यरत होते.
सांभाळून कामावर जा लवकर घरी ये.. घरच्यांनी दिला होता निरोप
विदीप जाधव हे मुंबईतील कळव्यात रहात होते. घटनेच्या दिवशी ते बाहेर पडले,तीच त्यांच्या कुटुंबियाशी शेवटची भेट ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे कळवा विटावा सूर्यनगर ,शनिवार पार्क जवळ श्रीकृष्ण विहार खोली क्रमांक 9 येथे कुटुंबीयांपासून गेल्या 25 वर्षांपासून रहात होते. त्यांचे आई -वडील, पत्नी, मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते आणि अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. 28 जानेवारी रोजी सकाळी 6 च्या सुमारास कामासाठी ते घराबाहेर पडले. तेव्हा सांभाळून कामावर जा, लवकर ये असा निरोप त्यांच्या आईने लेकाला दिला होता. मात्र त्यानतंर जाधव परत आलेच नाहीत, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी थडकली आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडालं.
वडिलांच्या उपचारांसाठी गावी जायचं होतं
मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारासाठी गावी जायचे होते. त्यांचे गाव बारामतीपासून 25 किमी अंतरावर फलटण तालुक्यात तरडवाडी आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजीच्या दौऱ्याची ड्युटी घेतली होती. बारामतीहून ते गावी जाणार होते. तसे त्यांनी अजित पवार यांना सांगितलं देखील होतं. घरी येतो असं त्याने गावी कळवलं होतं. पण अजित पवार यांच्यासोबतच विमानतील तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरला.