निवडणुका समोर ठेऊन राज्यात दंगल घडवण्याचा डाव ? कोल्हापुरातील अशांततेवरून अजित पवारांचा आरोप

| Updated on: Jun 07, 2023 | 3:17 PM

कोल्हापूरमध्ये झालेल्या प्रकारासाठी कोण जबाबदार आहे याचा छडा लावला, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

निवडणुका समोर ठेऊन राज्यात दंगल घडवण्याचा डाव ? कोल्हापुरातील अशांततेवरून अजित पवारांचा आरोप
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : कोल्हापूरमध्ये जो राडा झाला, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच निवडणूका समोर ठेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
एका आक्षेपार्ह स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर प्रचंड मोठा मोर्चा काढला.

जमावबंदीचे आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. जमाव ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या राड्यामागे नेमका कोणाचा आहात आहे, काय हेतू आहे याचा सरकारने लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी केली. अफवा पसरवून दंगल घडवण्याचा घाट घातला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.

दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्या

कोल्हापूर हे शांतताप्रिय शहर असून येथे अशांतता निर्माम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा, असे ते म्हणाले. तसेच हा राडा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा, त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करू नये. समाजकंटकांवर कारवाई करण्यास पोलिस सक्षम आहेत, असेही अजित पवार म्हणाले. पोलिसांना त्यांची कारवाई करण्यास मोकळीक द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच हे आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवले, त्याची सखोल चौकशी व्हावी. ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरीही त्यात हस्तक्षेप न करता कठोर कावाई व्हावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.