आंबेडकर आडनाव असलं म्हणजे…आनंदराज यांनी माफी मागावी, अन्यथा…; अजितदादांवरील विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक
अजितदादांवरील विधानानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. आनंदराज आंबेडकर यांनी माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे.

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर अजित पवारांवरील वक्तव्याने चर्चेत आले आहेत. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का? असं विधान आनंदराज आंबेडकर यांनी जालन्यात केलं. आनंदराज आंबेडकर यांच्या विधानानंतर अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने आनंदराज आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध केला. आंबेडकर आडनाव असलं म्हणजे अक्कल असतेच असं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी टीका केली. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही निषेध नोंदवला आहे.
सुनील तटकरेंकडून आनंदराज आंबेडकरांचा निषेध
खासदार सुनील तटकरे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटलं की, आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य निधेषार्ह आहे. त्यांचा जाहीर शब्दात धिक्कार व्यक्त करतो. लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. आमचे स्वर्गीय नेते अजितदादांचं महाराष्ट्रातील योगदान मोठं आहे. दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नव्हे, तर देश हळहळला. अशावेळी असं वक्तव्य करणे निंदनीय आहे’.
सूरज चव्हाण काय म्हणाले?
सूरज चव्हाण म्हणाले, ‘आनंदराज आंबेडकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करतो. हयात नसलेल्या व्यक्तीवर बोलून त्यांनी अकलेची दिवाळखोरी दाखवलेली आहे. फक्त आंबेडकर आडनाव असलं म्हणजे अक्कल असतेच असं नाही. अजितदादांवर केलेल्या विधानाची त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संविधानिक पद्धतीने त्यांना भेटतील तिथे विरोध करू’, असं म्हणत सूरज चव्हाण यांनी आनंदराज आंबेडकर यांना माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
आनंदराज आंबेडकर काय म्हणाले होते?
आनंदराज आंबेडकर यांनी राज्यातील दुष्काळावरून सरकरावर टीका केली. ‘आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का? असा उपरोधिक सवाल आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. परंतु भाषणानंतर आनंदराज आंबेडकरांनी सारवासारव केली. अजित पवार यांनी याआधी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा उपरोधिकपणे उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं.