क्षणोक्षणी माझ्या वडिलांची आठवण..; अशोक सराफांचा ‘आदि अनंत’ पाहिल्यानंतर रवी जाधव भावूक
12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून नात्यांमधील प्रेम, सहवास आणि आपल्या माणसांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेण्याची जाणीव होते, असं रवी जाधव यांनी म्हटलं आहे.

Ravi Jadhav: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आदि अनंत’ या चित्रपटाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल लिहिताना त्यांना त्यांच्या दिवंगत वडिलांची आठवण झाली आणि ते भावूक झाले. इतकंच नाही, तर त्यांनी वडिलांबरोबरचा एक जुना फोटोही शेअर केला आहे. हा फोटो वडिलांच्या निधनाच्या अवघ्या दहा दिवस आधीचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रवी जाधव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘आदि अनंत’ चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं कौतुक केलं आहे. विशेषतः अशोक सराफ यांनी साकारलेल्या आजोबांच्या भूमिकेने त्यांना भावूक केलं. अशोकमामांनी ही भूमिका इतक्या सहजतेने आणि सच्चेपणाने साकारली आहे की, त्यांना पडद्यावर पाहताना क्षणोक्षणी आपल्या वडिलांची आठवण येत होती, असं रवी जाधव यांनी म्हटलं आहे.
रवी जाधव यांची पोस्ट-
‘आदि-अनंत.. आजोबा आणि नातू यांच्या नाजूक नात्याची महेश लिमये यांनी अत्यंत बारकाईने केलेली सुंदर गुंफण. घरातल्या वस्तूंच्या मांडणीपासून संकर्षण कऱ्हाडे यांच्या कथा-पटकथेतील बारीकसारीक तपशिलांपर्यंत सगळीकडे एक सच्चेपणा जाणवतो. महेशचा छायाचित्रकाराचा डोळा आणि त्याचं दिग्दर्शनकौशल्य प्रत्येक क्षणी जाणवत राहतं. संकर्षण, सखी गोखले आणि योगेश शिरसाट यांचा सहजसुंदर अभिनय आणि कविता लाड यांनी साकारलेली वेगळी, आव्हानात्मक भूमिका यामुळे पडद्यावरच्या घटना आपल्या डोळ्यांसमोर खरोखरच घडत आहेत, असं वाटू लागतं,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘आणि अशोकमामांबद्दल काय बोलावं? ते ही भूमिका इतक्या सच्चेपणाने जगले आहेत की त्यांना पाहताना मला क्षणोक्षणी माझ्या वडिलांची आठवण येत होती. चित्रपट संपताना आपण भावूक होतो, हे खरं. पण मनात उरते ती आपल्या माणसांची काळजी घेण्याची एक ओढ. हेच या चित्रपटाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. संगीत, वेशभूषा, रंगभूषा, कलादिग्दर्शन आणि संकलन या सगळ्यांची साथ चित्रपटातला सच्चेपणा आणखी अधोरेखित करते. सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पहावा आणि अनेकांना पाहण्यास सुचवावा. ‘आदि-अनंत’च्या संपूर्ण टीमला माझ्याकडून कडकडून मिठी आणि लक्ष लक्ष शुभेच्छा! (शेवटचा फोटो बाबा जाण्याच्या अवघ्या दहा दिवस आधीचा आहे. तेव्हा हा क्षण पुढे माझ्यासाठी इतका मोलाचा ठरेल, असं वाटलंही नव्हतं. आजही तो फोटो पाहिला की क्षणभर बाबा पुन्हा जवळ असल्यासारखं वाटतं.)
‘आदि अनंत’ हा आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित भावनिक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक सराफ आजोबांच्या भूमिकेत, तर संकर्षण कऱ्हाडे नातवाच्या भूमिकेत दिसतात. महेश लिमये यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, संकर्षण कऱ्हाडे यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे. सखी गोखले, वैदेही परशुरामी आणि कविता लाड यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
