Bhairav Battalion: शत्रूचे कंबरडे मोडणार, कोण आहेत लष्करातील ‘भैरव’? कशी होते भरती, कुठं मिळतं प्रशिक्षण?
Bhairav Battalion: गेल्या काही दिवसांपासून लष्कारातील भैरव या तुकडीचे जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. कशी आहे ही तुकडी, सामान्य नागरिकाला होता येतं का भरती? का स्थापन करण्यात आली नवीन तुकडी?

Bhairav Battalion: जगातील अनेक भागात युद्ध सुरू आहेत. या युद्धात आधुनिक शस्त्रांसह नवनवीन युद्धनीताचा वापर होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान हालचाली आणि अचूक कारवाईला अत्यंत महत्त्व आले. इस्त्रायलसह मध्य-पूर्वेसह अनेक देशात अमेरिकेने चालवली लष्करी मोहीम चर्चेत आहे. त्याचवेळी भारतीय लष्कारानेही भैरव बटालियन ही विशेष लढाऊ तुकडी सज्ज केली आहे. ही तुकडी पायदळ आणि पॅरा विशेष दलातील दुवा मानली जात आहे. आधुनिक आणि बदलत्या युद्धनीतीसाठी लष्काराने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
भैरव बटालियन कशासाठी?
जागतिक युद्धाचे परिमाण आणि परिणामही बदलत आहेत. वेगवान घडामोडी, सॅटेलाईटपासून आधुनिक शस्त्रांचा वापर, ड्रोन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि तातडीने वेगवान हालचालींसाठी चपळ तुकडींची गरज आहे. हेच हेरून लष्काराने भैरव बटालियन सुरू केली आहे. आता प्रत्येक सामरिक कारवाईसाठी पॅरा एसएफवर अवलंबून न राहता तातडीच्या मोहिमा जलदगतीने पूर्ण करण्यासाठी हे भैरव सज्ज झाले आहेत. यामुळे आता पॅरा फोर्सेससह एनएसजी कमांडो आणि इतर तुकड्यांवरील भार हलका होईल.
भैरवची खतरनाक रचना
भैरव बटालियनमध्ये 250 विशेष प्रशिक्षित जवान आहेत. ही तुकडी कमी वेळेत जलद हालचाल करते. या जवानांकडे अत्याधुनिक असॉल्ट रायफल्स, नाईट व्हिजन उपकरणं, थर्मल इमेजर्स, पाळत ठेवणारे ड्रोन, इतर अत्याधुनिक शस्त्र आहेत. शत्रूंचा अचूक ठिकाणा हेरून तात्काळ हल्ला करणे, घुसखोरी रोखणे, तोफखाना, पायदळ आणि हवाई तुकडीला मदत करण्यासाठी हे भैरव फार उपयोगी ठरणार आहेत. वाळवंट, घनदाट जंगल, नियंत्रण रेषेवरील आगळीक अथवा इतर आव्हानात्मक ठिकाणी मोहिम फत्ते करण्यासाठीचे कठोर प्रशिक्षण या तुकडीला देण्यात आले आहे.
निवड आणि प्रशिक्षण कुठे?
सामान्य नागरिकांना या तुकडीसाठी थेट भरती करून घेत नाहीत. भारतीय लष्करातील विविध रेजिमेंटमधील शारीरिकदृष्या तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या कणखर जवानांची या विशेष तुकडीसाठी निवड करण्यात येते. लांब पल्ल्याची धाव, जड ओझ्यासह मोठा पल्ला गाठणे, अडथळा शर्यत आणि अत्यंत कठीण वातावरणात निर्णय घेण्याची क्षमता यावर या जवानांची निवड करण्यात येते. या जवानांची निवड झाल्यावर त्यांना दोन ते तीन महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणातून जावे लागते. या प्रशिक्षणात मोठा कस लागतो. या जवानांना अत्याधुनिक शस्त्रांसह ड्रोन प्रशिक्षण आणि युद्धनीतीचा अभ्यास शिकवला जातो.
