कोकणातल्या या सुंदर गावातील सर्वच ग्रामस्थ 7 दिवस होतात गायब, नेमकी जातात कुठे? तुम्हालाही नवल वाटेल

आजही अनेक गावांमध्ये पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथा परंपरा तेवढ्याच श्रद्धेनं पाळल्या जातात. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. अशीच एक प्रथ आजही तळकोकणात पाळली जाते.

कोकणातल्या या सुंदर गावातील सर्वच ग्रामस्थ 7 दिवस होतात गायब, नेमकी जातात कुठे? तुम्हालाही नवल वाटेल
गावपळण प्रथा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 01, 2026 | 5:22 PM

आजही अनेक गावांमध्ये पूर्वजांकडून चालत आलेल्या प्रथा परंपरा तेवढ्याच श्रद्धेनं पाळल्या जातात. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. अशाच काही प्रथा तळकोकणात आजच्या काळातही तेवढ्याच उत्साहात पाळल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात दरवर्षी अशी एक प्रथा पाळली जाते. ज्यामध्ये  ग्रामदैवताच्या आदेशानं शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ आपलं गाव सोडून गावाच्या वेशीबाहेर डोंगराच्या आडोशाला आपला संसार थाटतात.  यालाच ‘गावपळण’ असं म्हटलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासन ग्रामस्थ ही प्रथा पाळत आले आहेत. ग्रामस्थ फक्त एकटेच गावाबाहेर जात नाहीत, तर या काळात आपले सर्व गुरंढोर घेऊन हे ग्रामस्थ घराबाहेर पडतात. या काळात गावात पूर्णपणे शुकशुकाट असतो.  या काळात गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

नेमकी काय आहे गावपळण?

सिंधुदुर्गच्या शिराळे गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जाते. बुधवारी 31 डिसेंबर रोजी गावपळणीला सुरुवात झाली आहे. शिराळे गावचं अराध्य दैवत असलेल्या गांगेश्वर यांचा आदेश आल्यानंतर गावपळणीला सुरुवात होते. यामध्ये ग्रामस्थ आपले सर्व गुरढोरं घेऊन गावाच्या वेशीबाहेर संसार थाटतात. गावाच्या वेशीबाहेर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरुपाच्या राहुट्या उभारून हे ग्रामस्थ तिथे राहतात. ही गावपळण तीन दिवस, पाच दिवस किंवा सात दिवसांची असते. या काळात गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.  एसटी देखील बंद ठेवण्यात येते.

ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार गावपळणीच्या काळात तीन दिवस गावात गावाचं अराध्य दैवत गांगेश्वर आणि इतर देवतांची सभा भरते, या सभेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको म्हणून सर्व ग्रामस्थ हे गावाबाहेर स्थलांतर करतात. तीन दिवसांनी देवाचा कौल घेतला जातो. जर कौल मिळाला नाही तर हे ग्रामस्थ पाच दिवस गावाबाहेर राहतात, जर पाचव्या दिवशीही मिळाला नाही तर मग सात दिवस या ग्रामस्थांचा गावाबाहेरच मुक्काम असतो. जेव्हा श्री गांगेश्वर यांचा कौल मिळतो तेव्हा पुन्हा एकदा गावभरतीला सुरुवात होते, अशी ही प्रथा आहे.