Chandrakant khaire : माझे फोन घेतले नाही, पदवीधरांचे कधी घेणार, चंद्रकांत खैरेंचा सतीश चव्हाणांवर घणाघात, अंबादास दानवे म्हणाले…
छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला रंग चढला आहे. ठाकरेंच्या सेनेचा पदाधिकारी मेळावा आज पार पडला. यावेळी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी सतिश चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मेळावा घेतला. यावेळी अंबादास दानवे यांनी सतीश चव्हाण यांच्यावर टीका करत कार्यकर्त्यांना ताकदीने लढण्याचे आवाहन केले. तर चंद्रकांत खैरे यांनीही चव्हाणांवर आरोप करत निवडणुकीत दिलीप घुगे यांना विजयी करण्याचा विश्वास व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित. ठाकरे शिवसेनेचे मराठा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार दिलीप घुगे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
भाषण करून जिंकायची ही निवडणूक नाही. आपल्या जिल्ह्यात 91 हजार मतदार आहेत, 217 आपल्याकडे बूथ आहेत. आपण नोंदणी नाही केली तरी या शहरात 25 हजार ते 30 हजार मतदार आपले आहेत. आपणसुद्धा संघटनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. आपण संघटना म्हणून निवडणूक लढतोय. प्रचार करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे ही मॅच काय टेस्ट नाही. आपल्या ट्वेंटी-ट्वेंटी खेळायची आहे, असं दानवेंनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीने मराठवाड्यात उमेदवार दिल्यामुळे आपण पुण्यात उमेदवार दिला, असंही त्यांनी सांगितलं. अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर ही जागा आपल्याला सुटली होती, पण शरद पवार पक्षाने उमेदवार दिला, त्यामुळे आपण सुद्धा कोल्हापूरच्या सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे असंही त्यांनी सांगितलं.
सतीश चव्हाणांवर घणाघात
समोर जो उमेदवार उभा आहे, त्याने आपल्याला खूप त्रास दिला आहे. सतीश चव्हाण यांनी गंगापूरच्या शिवसेनेला खूप त्रास दिला आहे. प्रशांत बंबने सुद्धा कधी त्रास दिला नाही, गंगापूरमध्ये आपले लोक फोडले. सतीश चव्हाणची मस्ती जिरवावी लागणार आहे. जिथं उजडेल तिथं उजडेल, आपण ताकतीने लढू, असं आवाहन अंबादास दानवेंनी यावेळी केलं.
चंद्रकांत खैरेंनी घेरलं
आपला उमेदवार काय लहान नाही. मनोज जरांगे एका दिवसात मोठा झाला. दिपके एका रात्रीत मोठा झाला. आपला सुद्धा दिलीप घुगे मोठा होईल. आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार मध्येचं तुतारीवाला घुसला. मागच्या वेळेस तीन वेळा निवडून आलेला उमेदवार कोणी निवडून आणलं, मागच्या वेळेस हाता पाया पडला माझ्या. माझ्या निवडणुकीला सतीश चव्हाण यांनी भुमरेचं काम केलं, आता त्याला नाही साफ केलं तर नाव बदलून ठेवा माझं. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ मुळे अण्णांनी उभी केली, नोकर भरतीसाठी 1 कोटी, 25 ते 50 लाख रुपये घेतो हा भ्रष्टाचार नाही का. आमदार सतीश चव्हाण यांच्यावर आरोप केला. संभाजीनगरच्या 91 हजार मतदारांना मी स्वतः फोन करून सांगेल. आपला खरखोर विजय होणार. तर सतीश चव्हाण पडणार आहे, तो फक्त फोनमुळे पडणार आहे. माझे फोन घेतले नाही. मी त्याला निवडून आणलं. माझे फोन घेतले नाही, तर पदवीधरांचे फोन कधी घेईल, असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी चव्हाणांवर टीका केली.
मराठावाड्यातील पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीकडून आमदार सतिश चव्हाण हे मैदानात आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दिलीप घुगे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांच्यात लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये ही मैत्रीपूर्ण लढत आहे पण सतिश चव्हाणांविरुद्ध मात्र ठाकरेगट आक्रमक भूमिकेत असून यंदा या निवडणुकीत काय घडणार? याकडे लक्ष लागलं आहे.
