“दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा,” राष्ट्रवादी कार्यालयावरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरी गरजले

| Updated on: Jul 01, 2021 | 7:17 PM

ज्या दोनचार लोकांनी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे," असे अमोल मिटकरी म्हणाले.

दगडफेक केली त्याला योग्य उत्तर दिले जाईल, ही भाजपसाठी धोक्याची घंटा, राष्ट्रवादी कार्यालयावरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरी गरजले
AMOL MITKARI
Follow us on

मुंबई : “राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याला घाबरत नाही. मात्र ज्या दोनचार लोकांनी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे,” असा इशारा राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर 30 जून रोजी एका तरुणाने दगडफेक केली. त्यानंतर आज (1 जुलै) दोन तरुणांनी राष्ट्रवादीच्या सोलापूर कार्यालयावर हल्ला चढवला. या प्रकारानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Amol Mitkari warns BJP and Gopichand Padalkar said will give right answer of Solapur NCP office attack)

येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा

“जिकडे कोणीच नाही. निर्मनुष्य ठिकाणी एक दोन कार्यकर्ते सोडून दगड मारुन मी वंचितांचा लीडर आहे, असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी पक्ष अशा छाटछूट आणि भेकड हल्ल्याना घाबरत नाही. मात्र त्यांच्या दोनचार लोकांनी जी दगडफेक केली असेल त्य़ांना योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही हिंसेचं समर्थन केले नाही. हा पुन्हा पब्लिसिटी स्टंट आहे,” असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच हा व्यक्ती पिसाळलेला आहे. येणाऱ्या काळात भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.

पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो 25 वर्षांचा तरुण आहे. त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे.

सोलापुरातील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. हा तरुण स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.

दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केलीय. याबाबत विचारलं असता कायदा हातात घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये खरिप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या :

VIDEO: ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची ‘तुंबळ लढाई’ सुरु? राऊतांना दिल्लीत का ‘महाभारत’ आठवतंय?; वाचा सविस्तर

Breaking : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले…

(Amol Mitkari warns BJP and Gopichand Padalkar said will give right answer of Solapur NCP office attack)