Amravati Mlc Teacher Constituency Election Result : माझ्यावरही देवाभाऊंचा आशीर्वाद, नाशिक सारखाच इथेही शिंदे शिवसेनेच्या उमेदवारासोबत दगाफटका का?
Amravati Mlc Teacher Constituency Election Result : आज राज्यात विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निकाल जाहीर होत आहे. एकूण 26 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा आज फैसला होईल.

आज राज्यात विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निकाल जाहीर होत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सरनाईक, काँग्रेसकडून आदिती पोहरे आणि ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांच्यात लढत आहे. शिक्षकांचा कौल कुणाला ? याचा आज फैसला होणार आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. मतमोजणीसाठी 175 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल आहे. शिक्षक मतदारसंघात 33 हजार 34 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.निवडणुकीत 92.25 टक्के विक्रमी मतदान झालं.
एकूण 26 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा आज फैसला होईल. महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे आणि भाजपाच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्यात तिरंगी लढत झाल्याची चर्चा आहे. 12 ते 16 तास मतमोजणीला लागण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीचा 15 ते 16 हजाराचा कोटा कुठल्याही उमेदवारांनी पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. मतमोजणीला 12 ते 16 तास लागणार असल्याने निकाल यायला रात्र होईल.
अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत
भाजपच्या बंडखोर उमेदवार सांगिता शिंदे यांनी निकालाआधी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. “शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट होणार या निवडणुकीत माझा विजय होईल” भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांचा विश्वास. “माझ्यावर देवाभाऊचाही आशीर्वाद होता. माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत होता मी नक्की विजयी होईल” असं संगिता शिंदे म्हणाल्या. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये बंडखोरी झालेली. गोकुळे गीते हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचे बंधू गणेश गीते भाजपत आहेत. त्यावेळी नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. ते शिंदे शिवसेनेचे उमेदवार होते. पण दराडे यांचा पराभव झालेला. आता अमरावतीमध्ये सुद्धा असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्यात किती वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे सकाळी 8.00 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीत 47 पदवीधर तर 30 शिक्षक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं असून आज संध्याकाळी पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता.