रवी राणा यांची माघार, उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार
रवी राणा यांनी शब्द मागे घेतले. पण, कार्यकर्त्यांसोबत आज संध्याकाळी आम्ही बैठक घेणार.

अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. आता हा आरोप त्यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केली. त्यानंतर रवी राणा यांनी माघार घेऊन दिलगिरी व्यक्त केली. पण, बच्चू कडू यांचा राग काही शांत होताना दिसत नाही. उद्याच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करू असं बच्चू कडू म्हणतात.
गुवाहाटीला जायचंय, तर दमडी पाहिजे. दमडीबाज म्हणून त्याची ओळख आहे, असे गंभीर आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर लावले होते. त्यानंतर बच्चू कडू म्हणाले, एक तारखेपर्यंत रवी राणा यांनी पुरावे द्यावे. जर एका बापाची औलाद असेल, तर तो पुरावे देईल, असे प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी ठणकावले.
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर रवी राणा म्हणाले, आम्ही सर्व एकच आहोत. त्यामुळं काही वाक्य निघाले असतील, तर ते परत घेतो. चुकीची वाक्य परत घेतो, असं राणा यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, मीच बच्चू कडू यांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केला होता. आमची सरकार बनविण्याची इच्छा आहे. तुम्ही आमच्या गृपमध्ये यावं, यासाठी मीच फोन केला होता. माझ्या एका फोनवरून ते आमच्यासोबत आले.
रवी राणा यांनी शब्द मागे घेतले. पण, कार्यकर्त्यांसोबत आज संध्याकाळी आम्ही बैठक घेणार. त्यानंतर उद्या दुपारी बारा वाजता कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करू, असं बच्चू कडू म्हणाले. त्यामुळं उद्या ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.