अनिल परब यांना जेल की बेल? साई रिसॉर्टप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, नक्की काय घडलं?

रत्नागिरीतील गाजलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची खेड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी सर्व आरोपींची सुटका झाल्याने परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनिल परब यांना जेल की बेल? साई रिसॉर्टप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, नक्की काय घडलं?
anil parab
| Updated on: May 06, 2026 | 1:42 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर आता कायदेशीर पडदा पडला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दापोलीतील मुरुड येथे अनधिकृतपणे साई रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर होता. या प्रकरणात केवळ अनिल परबच नव्हे, तर तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड गावचे सरपंच यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. भारतीय दंड विधान (IPC) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली हा खटला चालवण्यात आला.

या इमारतीचे काम पूर्ण नसतानाही कागदोपत्री कर आकारणी केली गेली. तसेच मुद्रांक शुल्क (Stamp Duty) बुडवून सरकारचे नुकसान करण्यात आले. हे बांधकाम ‘सीआरझेड’ (CRZ) नियमांचे उल्लंघन करून करण्यात आले. त्यासोबतच बनावट स्वाक्षरी आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी मिळवण्यात आली, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.

यावेळी वकील अ‍ॅड. सुधीर बुटाला यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी स्पष्ट केले की, जमीन खरेदी आणि त्यावर झालेले बांधकाम हे दोन स्वतंत्र कायदेशीर घटक आहेत. केवळ अनुमानावर आधारित भ्रष्टाचार किंवा फसवणुकीचे आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत. न्यायालयाने हा तांत्रिक युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानंतर सरकार पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

अनिल परब यांच्यावर सातत्याने टीका

हे प्रकरण केवळ कायदेशीर नसून राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टवर हातोडा पडणारच, असा दावा करत अनिल परब यांच्यावर सातत्याने टीका केली होती. या प्रकरणात ईडीनेही तपास केला होता. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अनिल परब यांची बाजू भक्कम झाली आहे. तर विरोधकांच्या आरोपांमध्ये हवा नसल्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us