Anil Parab : ‘आजचा मेळावा हा…’, मनसे-ठाकरे गटाची युती होईल का? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य
Anil Parab : आज मराठी विजय मेळावा होत आहे. अजून मनसे आणि उद्धव ठाकरे गटाची युती झालेली नाही. मुंबई महापालिका आणि अन्य निवडणुकीसाठी ही युती होणार का? हा प्रश्न आहे. त्या बद्दल उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी सूचक वक्तव्य केलय.

हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 18 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
“आजचा एक दिवस आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे. सुवर्ण क्षण याच्यासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी मनाची एकजूट बांधली आणि मराठी मनाचा पुरस्कार केला, पुन्हा एकदा आज ठाकरे बंधू या मराठीच्या विषयावर एकत्र आलेले आहेत” असं अनिल परब म्हणाले. “मराठी मनाला त्यांनी साद घातली. हिंदी सक्ती विरोधात सरकारने जी काही जबरदस्ती चालवली होती. ती हाणून पाडली. त्याचा आज विजयोत्सव आहे. प्रत्येक मराठी माणसाला या बद्दल अभिमान आहे” असं अनिल परब म्हणाले.
बघा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय
“आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. दसरा,दिवाळी गुढीपाडवा हे जसे आमचे मोठे सण आहेत, तसा आमच्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस मोठा सण आहे. बघा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे. ज्यावेळेला ठाकरे बंधुंनी घोषणा केली, मराठी लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, हा मराठी मनाचा विजय आहे. त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकतोय” असं अनिल परब म्हणाले.
मेळाव्याच्या पुढे राजकीय भविष्य काय
या मेळाव्याच्या पुढे राजकीय भविष्य काय असेल? त्यावर ‘आजचा पहिला टप्पा आहे. पुढे काय होणार, ते हळू-हळू ठरेल’ असं उत्तर अनिल परब यांनी दिलं. म्हणजे भविष्यात मनेस आणि उद्धव ठाकरे गटाची युती बऱ्याच अंशी या मेळाव्याच यश, तो कसा पार पडतो यावर अवलंबून असेल.