
Amruta Fadnavis: गायिका अंजली भारती हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान अंजली हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अंजली हिच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. सांगायचं झालं तर, अंजली हिने 13 जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांबद्दल नको ते वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेकांनी अंजली यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अंजली यांच्यावर काय कारवाई होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भंडाऱ्यात 13 जानेवारी रोजी भीम मेळावा झाला. या मेळाव्यात अंजली भारती हिने बालिकांवरील बलात्कार आणि अत्याचार संदर्भात जोरदार टिकास्त्र सोडले. पण अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलताना अंजली हिची जीभ घसरली. महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कारावर बोलत असताना, कारण नसताना अंजली हिने अमृता फडणवीसांना खेचलं. ‘जो बलात्कार करतो त्याचं डोकं, मान कापा…’ असं आवाहन अंजली यांनी केलं… एवढंच नाही तर, जो कोणी बलात्काऱ्याचे डोकं, मान कापून आणेल त्याला माझी अर्धा संपत्ती देईन आणि 50 लाख रुपये देईल… अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली…
सध्या अंजली हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. बलात्काराच्या संदर्भात वक्तव्य करताना अंजली भारती हिने अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलं. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अंजली चर्चेत आली आहे. पण तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अंजली भारती ही बौद्ध अनुयायी विद्रोही गायिका म्हणून ओळखली जाते. अंजली हिने अनेक गाणी देखील गायली आहे. दीदी अंजली भारती या नावाने तिचं यूट्यूब चॅनेल देखील आहे.
यूट्यूब चॅनेलवर अंजली हिचे जवळपास पावणेसहा लाखांच्या आसपास सबस्क्राईबर्स आहेत. अनेक गाण्यांचे व्हिडीओ अंजली हिने तिच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील भारती हिने अनेक गाणी गायली आहेत. पण मिसेस मुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अंजली मोठ्या अडचणीत सापडली आहे.