मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत, दरम्यान आता आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला आहे.

मोठी बातमी! राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 3:15 PM

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला होता. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. अमरावतीच्या वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे काही वेळातच भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह विक्रम ठाकरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अलीकडेच विक्रम ठाकरे यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांची देखील उपस्थिती असणार आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला जळगावात देखील मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आणि उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.  जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा तसेच सभा पार पडणार आहे.  याच कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह तब्बल वीस ते पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी राज्यात मोठा धक्का मानला जात आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.  राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती, पदावर असूनही काम करता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, त्यापूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे.