
भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही मच्छिमारांनी पाण्यातून निघणारे भयानक बुडबुडे आणि पाण्याच्या मध्यभागी येणाऱ्या जोरदार लाटांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी चुलीवरील भांड्यात असलेल्या पाण्यासारखे उकळत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील पालघर ते गुजरात पर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समुद्राच्या किनारी भागात पाणी उकळत असल्यामुळे मच्छिमारांसह सरकारचीही चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांना पाण्याखालील मोठ्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याची भीती आहे. तसेच हे अज्ञात भूगर्भीय क्रियाकलाप किंवा विषारी वायू गळतीचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे आता पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छिमारांना या क्षेत्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच तज्ञांची एक विशेष टीम या उकळत्या पाण्याची चौकशी करत आहे.
अरबी समुद्रातील या रहस्यमयी बुडबुड्यांबाबत बोलताना पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी म्हटले की, ‘ही घटना अत्यंत गंभीर आणि असामान्य आहे.’ मच्छिमारांनी पाठवलेल्या व्हिडिओंमध्ये पाण्याचा एक मोठा भाग सतत उकळत असल्याचे दिसून येत आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर अशी घटना सामान्यतः कधीच पहायला मिळत नाही.
Mysterious Circular Water Formation Spotted in Arabian Sea Near Gujarat Coast, Fishermen Alarmed#Vasai #Gujratcoast #Arabiansea pic.twitter.com/8i8ajcbi9R
— Pune Pulse (@pulse_pune) January 20, 2026
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, ही सामान्य समुद्राची लाट नाही. खोल समुद्रातील एक मोठी प्रक्रिया यासाठी जबाबदार असू शकते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सागरी आणि औद्योगिक संस्थांना तात्काळ बोलावण्यात आले आहे. अधिकारी आता पाण्याचे नमुने आणि आजूबाजूच्या डेटाचा बारकाईने अभ्यास करत आहेत.
पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सध्या सागरी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहे. ही घटना नैसर्गिक आहे की मानवी चुकीचा परिणाम आहे हे शोधले जात आहे. या भागात असंख्य औद्योगिक पाइपलाइन आणि दळणवळण केबल्स आहेत. जर ही पाइपलाइन गळती असेल तर ती सागरी पर्यावरणासाठी विनाशकारी ठरू शकते. त्यामुळे मच्छिमारांना या भागात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गावरून जाताना जहाजांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण ही जर गॅस गळती असेल तर आग लागण्याचा किंवा ऑक्सिजन कमी होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो.