लिंगपिसाट खरात प्रकरणात मोठी अपडेट! मंत्री आणि अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, थेट राष्ट्रपतींनाच पत्र; माजी मंत्र्याने थोपाटले दंड

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट पत्र लिहिले आहे.

लिंगपिसाट खरात प्रकरणात मोठी अपडेट! मंत्री आणि अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, थेट राष्ट्रपतींनाच पत्र; माजी मंत्र्याने थोपाटले दंड
अशोक खरात
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 4:19 PM

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सतत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणी नवी खळबळ उडाली आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना थेट पत्र लिहून, या प्रकरणातील सर्व संबंधित केंद्र आणि राज्यस्तरातील मंत्र्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सुबोध सावजी यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे.

सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन झाली आहे. सत्य समोर आणण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आता कडक पावले उचलणे गरजेचे आहे. माजी मंत्र्यांनी पत्रात नमूद केले की, नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला वेग मिळेल आणि प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल. यामुळे तपास यंत्रणेला महत्त्वाचे संकेत मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींना केली हस्तक्षेपाची मागणी

सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, या प्रकरणात केंद्र आणि राज्य पातळीवरील संबंधित मंत्र्यांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी थेट हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या या पत्राने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशोक खरात प्रकरण आता फक्त एका भोंदूबाबाच्या लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता, उच्चपदस्थांच्या संभाव्य सहभागाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचले आहे, असे दिसत आहे.

एसआयटी सध्या या प्रकरणात वेगाने तपास करत असून, खरातच्या मोबाइल डेटा, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांच्या साखळीचा शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर सुबोध सावजी यांची ही मागणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रपतींकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us