आमची ओळख असल्यामुळेच…, अशोक खरात प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
अशोक खरात प्रकरणावरून पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलवणारा असा सवाल त्यांनी केला होता, त्यावर आता केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. राज्यातील काही नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो समोर आले आहेत, तसेच ते अशोक खरातच्या संर्पकात होते अशी देखील चर्चा सुरू आहे, काही नेत्यांनी अशोक खरातला अनेकदा फोन केल्याचं देखील बोललं जात आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी बोलावणार असा थेट सवालच त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केला आहे. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांच्या आरोपांना दीपक केसरकरांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हणाले केसरकर?
एसआयटी (SIT) आणि ईडी (ED) या दोन्ही यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. कोणाचे नाव चुकून आले तरी त्याला चौकशीसाठी बोलावले जात आहे. कोणाला भेटणे किंवा कोणासोबत फोटो असणे हा गुन्हा ठरू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणे योग्य नाही. आमची ओळख आसल्यामुळे आमच्यावर आरोप होत आहेत. विनाकारण बदनामी करत आहेत. कुठल्याही महसूल यंत्रणेला आम्ही फोन केला नाही. दिलीप लोंढे माझे कधीही पीए नव्हते. 189 काॅल त्यांनी केले, त्याच्याशी माझा काय संबध आहे? मी खरातला फोन केले होते, ते रेकाॅर्ड आहे माझ्याकडे आहे. हा बदनामीचा प्रकार आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काळी जादू करण्यात आली होती, असा आरोप देखील करण्यात येत आहे, यावर देखील यावेळी दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नाही. दादांचा अपघात दुर्दैवी होता, त्याचे सर्वांनाच दुःख आहे. या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, असं यावेळी दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.