मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत… भोंदू बाबा अशोक खरातच्या हाती सर्वांचाच रिमोट कंट्रोल, ते 45 बडे नेते कोण?

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात SIT ला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाला असून, ४० ते ४५ राजकीय नेते खरातच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. खरातने नेत्यांचे नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह केले होते, ज्याचा आता उलगडा होत आहे.

मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत... भोंदू बाबा अशोक खरातच्या हाती सर्वांचाच रिमोट कंट्रोल, ते 45 बडे नेते कोण?
ashok kharat
| Updated on: Mar 31, 2026 | 11:50 AM

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजकारणापर्यंत पोहोचल्याची मोठी माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागलेल्या नवीन पुराव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा तपास करणाऱ्या SIT ला आता महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने राजकीय क्षेत्रातही आपले जाळे घट्ट विणले होते.

राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या संपर्कात तब्बल ४० ते ४५ बडे राजकीय नेते नियमितपणे असायचे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने या नेत्यांचे मोबाईल नंबर त्यांच्या खऱ्या नावाने न ठेवता कोडवर्डमध्ये सेव्ह केले होते. यातील कोणता कोडवर्ड नक्की कोणासाठी वापरण्यात आला, याचा उलगडा आता फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे केला जात आहे.

विशेष म्हणजे अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. या पत्रिकेत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आली होती. यात काही विद्यमान मंत्र्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक नेते हे या विवाह सोहळ्याला उपस्थितही राहिले होते.

राजकीय निर्णयांचे रिमोट कंट्रोल खरातच्या हाती?

त्यासोबतच SIT च्या तपासातून आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. अनेक नेते कोणतेही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरातचा सल्ला घ्यायचे. अगदी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची वेळ आणि तारीख सुद्धा अशोक खरातच ठरवत असे, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेत या भोंदू बाबाचा हस्तक्षेप किती खोलवर होता, हे स्पष्ट होत आहे.

फॉरेन्सिक क्लोन डेटा आणि SIT ची कारवाई

विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या मोबाईलचा क्लोन डेटा अहवाल SIT ला प्राप्त झाला आहे. या डेटामध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि चॅट्स असल्याची शक्यता आहे. न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत खरातविरुद्ध १० गुन्हे दाखल झाले असून त्यातील ८ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. त्यासोबतच खरातची १५०० कोटींची मालमत्ता आणि १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर आहेत. SIT आता या क्लोन डेटाच्या आधारे खरातच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची आणि त्याच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदारांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us