लोकल अंकल… किमान शर्ट तरी बदलून घ्यायचा… अभिजीत दीपकेंची खोचक टीका; तो फोटो पोस्ट…
अभिजीत दीपके यांच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनाला स्थानिकांनी विरोध केला. मात्र, हे 'स्थानिक' भाजप कार्यकर्ते असल्याचे उघड होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दिपकेंनी फोटो पोस्ट करून टीका केली, तर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही आंदोलनाचे महत्त्व सांगत विरोधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा म्हणून हे आंदोलन होत आहे. मात्र, या आंदोलनाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. शांततेचा भंग करू नका, आम्हाला त्रास होतोय, असं या स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र, स्थानिकांचं नेतृत्व करणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. यावरून अभिजीत दीपके यांनी एक पोस्ट करून त्याला टोला लगावला आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या शिवाजी पार्क येथील आंदोलनाला स्थानिकांनी केलेल्या विरोधाला नवं वळण लागलं आहे. स्थानिक दादरकरांच्या नावाखाली विरोध करणारे भाजपचे कार्यकर्तें असल्याचा दावा अभिजीत दीपके यांनी एका पोस्टद्वारे केला आहे. प्रकाश बेलवाडे यांनी जेलभरो आंदोलनाला विरोध केला होता. पण प्रकाश बेलवाडे हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांचा मंत्री आशिष शेलार यांच्यासोबतचा फोटोच अभिजीत दीपके यांनी पोस्ट केला आहे.
या फोटोत प्रकाश बेलवाडे हे आशिष शेलार यांच्या मागे बसलेले दिसत आहेत. या फोटोवर अभिजीत दीपके यांनी खोचक टिप्पणी केली आहे. लोकल अंकल किमान शर्ट तरी बदलून घेतला असता, अशी खोचक कमेंट अभिजीत दीपके यांनी केली आहे. मंगळवारी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसराची पाहणी करण्यासाठी सीजेपी समन्वयक आले होते. त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला होता. स्थानिक दादरकर असल्याचं म्हणत हा विरोध करण्यात आला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये प्रकाश बेलवाडे आघाडीवर होते. मात्र बेलवाडे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने राजकीय हेतूनेच त्यांनी या आंदोलनाला विरोध केल्याचं उघड झालं आहे.
Local uncle se shirt toh change karwa lete hai.
Uncle sitting with the BJP minister opposing CJP volunteers https://t.co/xtGUSUMEIc pic.twitter.com/dFbbXyBBTI
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 29, 2026
शिवाजी पार्क यांच्या बापाचं आहे का?
दरम्यान, या प्रकारावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाला आक्षेप घेणारे हे कोण आहेत? हा प्रश्न सरकारचा आहे. हे कोण रहिवाशी आहेत? की भाजपचे बुरखा पांघरलेले लांडगे आहेत? शिवाजी पार्क काही दोन चार रहिवाशांच्या मालकीचा नाहीये. या ठिकाणी दोन चार लोक कर भरत नाही. त्यामुळे त्यांच्या आक्षेपाला महत्त्व नाही. शिवाजी पार्क मैदानाला चळवळीचा इतिहास आहे. या मैदानाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. याच शिवाजी पार्काने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जवळून पाहिली आहे. अनेक मोठ्या मोठ्या सभा येथे झाल्या आहेत. या विरोध करणाऱ्यांच्या बापाचं शिवाजी पार्क आहे का?, असा संताप संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
लोक रस्त्यावर उतरून उत्तर देतील
शिवाजी पार्क उद्यान मंदिरा संदर्भात तक्रार करणारे हेच लोक आहेत. मग हे कसले हिंदू? देशात मतचोरी झाली आहे. एक भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. त्याच्या विरोधात लोकांच्या मनात संताप आहे. हा संताप देशभरात आहे. आज आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक उद्या 6 डिसेंबरलाही विरोध करतील. विरोध करणारे हे स्थानिक नागरिक नव्हते. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अंगावर आलेला घोटाळाव वाचवण्याचं काम ते करत आहेत. भाजपला लॉजिकल गोष्टींना उत्तर देता येत नाही. त्यामुळे ते असा विरोध करत आहेत. त्यांना कितीही विरोध करू दे. जनता रस्त्यावर उतरून त्यांना उत्त देईल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
