Aurangabad | सतरंज्या विकायला आलेल्यांचा मंगळसूत्रावर डल्ला, औरंगाबादेत मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांना अटक

मध्य प्रदेशातून चादरी विकण्यासाठी आलेल्या जसपालसिंग बहादुरसिंग भाटीया व चंदनसिंग संतोषसिंग दुधानी या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Aurangabad | सतरंज्या विकायला आलेल्यांचा मंगळसूत्रावर डल्ला, औरंगाबादेत मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांना अटक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 18, 2022 | 11:17 AM

औरंगाबादः शहरात सतरंज्या विकण्यासाठी आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर (Mangalsutra) डल्ला मारला. सनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या या दोघांनी तीन मंगळसूत्र चोरली. उस्मानपुऱ्यातील भाजीवाली बाईचा पुतळा, पुंडलिक नगर (Pundlik Nagar) आणि नागेश्वरवाडी येथून तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. या घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) कैद झाल्या. शहरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांचा माग काढत त्यांना पकडले. मोंढा नाका परिसरातील लॉजमधून त्यांचा मोबाइल नंबर मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत त्यांना दौलताबाद किल्ल्याच्या पुढे पकडले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकल्यानंतर या दोघांनीही गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून एक दुचाकी, सतरंज्या, चोरलेले तीन मंगळसूत्र आदी 03 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

असे अडकले जाळ्यात…

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांचे पथक रविवारी सकाळपासून चोरांचा शोध घेत होते. कारण आठ तासात तीन मंगळसूत्रांची चोरी झाली होती. शहरातील परिसर पिंजून काढल्यानंतरही चोरटे सापडले नसल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खाली एका दारूच्या दुकानाजवळच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे आढळले. त्या दुकानाच्या पाठीमागील भागात एका लॉजमध्ये जाऊन चौकशी केली असता काही वेळापूर्वीच या लोकांनी चेकआऊट केल्याचे कळले. तसेच मध्यप्रदेशातून हे लोक चादरी विकण्यासाठी तीन दिवसांपूर्वी शहरात आल्याचीही माहिती मिळाली. लॉजवर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावरून हे लोक दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात पोहोचल्याची माहिती मिळाली.

किल्ल्याच्या परिसरात सापळा

शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली. या पथकांनी धुळे, मुंबई, नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यांवर सापळा रचला. जोघे चोरटे दौलताबाद किल्ल्याच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिर परिसरात दिसले. पोलिसांना पहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तीन मंगळसूत्रांसह दुचाकी, चादरी, असा एकूण 3 लाख 21 हजार 735 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेले कोण?

मध्य प्रदेशातून चादरी विकण्यासाठी आलेल्या जसपालसिंग बहादुरसिंग भाटीया व चंदनसिंग संतोषसिंग दुधानी या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील सतवास येथील रहिवासी असल्याचे चौकशीतून उघड झाले. अधिक विचारपूस केली असता, विक्रीसाठी आणलेल्या चादरी न विकल्यामुळे चोरीकडे वळालो, अशी कबुली त्यांनी दिल्याचे, पोलिसांनी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें