Aurangabad | हर्सूल तलावाची मनपा प्रशासकांकडून पाहणी, पर्यायी पाणीपुरवठा वाढवण्याच्या हालचाली

हर्सूल तलाव, शक्कर बावडी ही विहीर तसेच इतर विहिरींचे पाणी मिळाले, तर सिडको-हडको येथील टाक्यांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Aurangabad |  हर्सूल तलावाची मनपा प्रशासकांकडून पाहणी, पर्यायी पाणीपुरवठा वाढवण्याच्या हालचाली
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी

|

May 06, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे औरंगाबादकर त्रस्त असून महापालिकेने (Municipal corporation) आता या समस्येवर उपाय शोधण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी नुकतीच हर्सूल तलाव (Harsul Lake), जलशुद्धीकरण केंद्र व हिमायत बाग येथील शक्कर बावडीची पाहणी केली. तसेच 10 एमएलडी पाणी वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. उन्हाळ्यात शहरातील पाण्याची मागणी वाढली असून त्यानुसार पाण्याचे असमान वितरण यामुळे गेल्या काही दिवसात शहरात अनेक आंदोलने झाली. त्यानंतर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी रितसर कार्यक्रमच हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पर्यायी पाणीपुरवठा वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

शक्कर बावडीला भेट

महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हर्सूल तलावाच्या इनलेटची पाहणी करून सूचना केल्या. यावेळी पाणी वाढवण्याच्या दृष्टीने हिमायतबाग येथील शक्कर बावडीचीही पाहणी केली. या विहिरीचे पाणी वापरता येईल का, यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी वाढवण्याच्या दृष्टीने तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. शक्कर बावडी येथून पाणीउपसा केल्यावर सध्याच्या पाणीपुरवट्यात जवळपास एक एमएलडीची वाढ होण्याचा अंदाज यावेळी अधिकाऱ्यांनी यक्त केला.

..जलकुंभावरील ताण कमी करणार

हर्सूल तलाव, शक्कर बावडी ही विहीर तसेच इतर विहिरींचे पाणी मिळाले, तर सिडको-हडको येथील टाक्यांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सदर वाढीव पाणीपुरवठा शहागंज आणि दिल्ली गेट येथील पाण्याच्या टाक्यांपर्यंत आणून पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

नव्या जलवाहिनीचे काम कुठवर?

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटी रुपयांची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केलं जात आहे. हैदराबाद येथील कंपनीला हे काम मिळाले असून कंपनीच्या औरंगाबाद येथील कारखान्यात या पाइप निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत 300 मीटर लांबीचे पाइप तयार झाले आहेत. पाइपचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणाऱ्या एजन्सीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात हे पाइप अंथरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज अभियंत्यांनी वर्तवला आहे.

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें