‘भावी’ काळात ‘आजी-माजी’ एकत्र? औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत

| Updated on: Sep 28, 2021 | 8:10 AM

औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे. अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी होताना दिसत आहे.

भावी काळात आजी-माजी एकत्र? औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
अब्दुल सत्तार औरंगाबाद भाजप शहराध्यक्षांच्या घरी
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्षांची चक्क घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे ‘आजी-माजी’ एकत्र येऊन ‘भावी’ काळात युती करण्याची शक्यता बळावली आहे.

भाजप शहराध्यक्षांची भेट

मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी थेट घरी जाऊन शहाराध्यक्षांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजप-शिवसेना युतीसाठी अब्दुल सत्तार सक्रिय झाल्याची चर्चा आधीपासून होती. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत युतीचे संकेत दिले होते.

औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे. अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी होताना दिसत आहे.

औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – 29
भाजप – 22
एमआयएम – 25
कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03
बसप – 05
रिपब्लिकन पक्ष – 01
अपक्ष – 18

भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली 30 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवू लागले. भाजपच्या विजय औताडे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. मात्र महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.

औरंगाबादेत सेना-भाजप युतीचीही चर्चा

औरंगाबाद महापालिकेत मनसे आणि भाजप युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदाही बहुरंगी होण्याची चिन्हं आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत न घेता रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेल. तर मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

कार्यकाळ संपून वर्ष उलटलं

औरंगाबाद महापालिकेचा कार्यकाळ संपून वर्ष उलटले आहे. आधी गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच निवडणुका स्थगित झाल्यामुळे औरंगाबाद महापालिका इलेक्शनलाही ब्रेक लागला होता. नंतर औरंगाबादमधील प्रभाग रचनेवरील आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.

पालघरमध्ये भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला

दरम्यान, जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची (MNS BJP) युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला होता. त्यातच पुण्यात (Pune) मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये (Palghar) झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या :

इजा बिजा तिजा! औरंगाबाद महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

मनसे-भाजप युतीची मुहूर्तमेढ औरंगाबादेतून? महत्त्वाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष!

38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत