VIDEO: नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार

| Updated on: Dec 21, 2021 | 11:42 AM

बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

VIDEO: नगरपंचायत निवडणुकीला गालबोट, बीड, उस्मानाबादेत मतदानावेळी दोन गटात हाणामारी; पोलिसांचा लाठीमार
voting in osmanabad
Follow us on

बीड: बीड आणि उस्मानाबादेत नगरपंचायत निवडणुकीला गालबोट बसला. मतदानावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने या दोन्ही जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उस्मानाबादेत तर तीन मतदारसंघात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर या तिन्ही मतदारसंघात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बीडमध्ये पाच नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. चारही पंचायत समितीत शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, वडणीतील तीन मतदान केंद्रांवर भाजप आणि राष्ट्रवादीत प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात मतदान सुरू असताना शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रकरण हामरीतुमरीवर आलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गट आक्रमक झाल्याने कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे वाद अधिकच पेटला आणि बघ्यांची गर्दीही वाढल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांना पांगवावे लागले. पोलिसांच्या लाठीमारानंतर दोन्ही गटातील वाद निवळला आणि मतदान शांततेत सुरू झालं.

216 उमेदवार रिंगणात

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी आणि केज नगरपंचायतसाठी मतदान सुरू आहे. एकूण 78 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी 65 जागेंसाठी निवडणूक असून तब्बल 216 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. दरम्यान निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झालीय.

उस्मानाबादेत चौघांवर गुन्हा

उस्मानाबादच्या तेर येथे अभ्यासिकेचे सामान ठेवण्यावरून सत्ताधारी व विरोधात हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हाणामारीनंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरोधात ढोकी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी 4 ग्रामपंचायत सदस्यांवर गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये शांततेत मतदान

नंदुरबार जिल्ह्यात धडगाव नगरपंचायत आणि 48 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र जिल्ह्यात असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानासाठी मतदार बाहेर पडत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. धडगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात असून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात नगरपंचायतीचे पहिली निवडणूक असून प्रचारात त्यांनी चांगलीच कसरत केली होती. तर दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी आणि भाजप खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांनी देखील प्रचारात रात्रंदिवस एक केला होता. त्यामुळे मतदारराजा कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहापुरात चोख बंदोबस्त

शहापूर नगरपंचायत निवडणूक 13 जागेंसाठी आज मतदानाला सुरवात झाली असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शहापुर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली 5 पोलीस निरीक्षक, 3 दंगल पथक, 25 पोलीस अधिकारी व 200 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यासह कडक पोलीस बंदोबातब तैनात करण्यात आला आहे. तसेच 100 मीटर सीमा रेषेच्या आतमध्ये उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यांना बाहेर काढण्यात आले व कोणता ही उचित प्रकार घडल्यास त्यांच्यावर त्वरित सक्त कारवाई केली जाणार आहे. मतदारांनी शांततेत मतदान पार पाडावे, असे आवाहन शहापूर उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या:

TET Exam : पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला ठोकल्या बेड्या

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध; विनायक राऊतांकडून गंभीर आरोप

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या हालचाली, राऊतांचं थेट आव्हान