औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?

शहरातील कर्णपुरा देवी तसेच सिडको एन-7 मधील दुर्गा माता मंदिरात भाविकांची तपासणी व कोरोना चाचणी सुरु केली आहे. तसेच या दोन्ही मंदिरात कोरोना लसीकरण केंद्रही सुरु करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: शहरातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र नवरात्राच्या पार्श्वभूमीवर विविध देवींच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. म्हणूनच औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Municipal corporation) कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शहरातील कर्णपुरा देवी (Karnpura devi) तसेच सिडको एन-7 मधील दुर्गा माता मंदिराच्या (Durga Mata Temple) ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तपासणी व कोरोना चाचणी सुरु केली आहे. तसेच या दोन्ही मंदिरात कोरोना लसीकरण (Vaccination) केंद्रही सुरु करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबर पासून या मंदिरांमध्ये या दोन्ही सुविधा देण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

2 डोस घेतलेल्या भाविकांना चाचणीतून सूट

ज्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना मात्र चाचणीतून सूट दिली जात आहे. मात्र ज्यांनी एकच डोस घेतला आहे त्यांना चाचणी सक्तीची आहे. शासनाच्या कवच कुंडल मोहिमेअंतर्गत शहरातील नियमित 45 लसीकरण केंद्रांबरोबरच पालिकेने 21 खासगी रुग्णालयांत मोफत लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत8 लाख 90 हजार 880 नागरिकांनी लस घेतली आहे. त्यापैकी तीन लाख 22 हजार 142 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर पाच लाख 68 हजार 738 जणांनी पहिला डोस घेतला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी 8 नवे रुग्ण, 2 मृत्यू

जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले. यात शहर 3, तर ग्रामीणच्या 5 जणांचा समावेश आहे. दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. रविवारी 14 जणांना (मनपा 6, ग्रामीण 8) सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,48,866 झाली. त्यापैकी 1,45,127 जण बरे होऊन घरी गेले आहेत. बळींचा आकडा 3,588 झाला आहे. सध्या 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नगरमधील संसर्गामुळे खबरदारी!

राज्य सरकारने नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून राज्यभरात मंदिरे खुली केली आहेत. त्यामुळे यंदा देवीच्या मंदिरांच्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र औरंगाबाद शेजारीच असलेल्या नगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतो आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारीचे पाउल म्हणून नगर जिल्ह्यांतून येणार्‍या नागरिकांची शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणीसह कोरोना चाचणी सुरू केली आहे.

इतर बातम्या- 

प्राध्यापकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापल्या, औरंगाबादेत खळबळ, कुठून आलं इतकं क्रौर्य?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI