रजिस्ट्री विभागातील कर्मचाऱ्यांचा संप, पहिल्याच दिवशी अडीच कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

| Updated on: Sep 22, 2021 | 6:32 PM

राज्यात सहाय्यक दुय्यम निबंधक आणि दुय्यम निबंधाकांची 300 पदे रिक्त आहेत. तर वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिकांच्या ज्येष्ठता याद्याही प्रलंबित आहेत. हे प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

रजिस्ट्री विभागातील कर्मचाऱ्यांचा संप, पहिल्याच दिवशी अडीच कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प
Follow us on

औरंगाबाद: नोंदणी व मुद्रांक विभाग अर्थात रजिस्ट्री विभागातील  (Department of Registration and Stamps ) रिक्त पदे आणि पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी या विभागातील कर्मचाऱ्यांनी 21 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे  औरंगाबादमध्ये पहिल्याच दिवशी साधारण अडीच कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मुद्रांक विभागातील संघटनेने दिली आहे.

काय आहेत मागण्या?

राज्यात सहाय्यक दुय्यम निबंधक आणि दुय्यम निबंधाकांची 300 पदे रिक्त आहेत. तर वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिकांच्या ज्येष्ठता याद्याही प्रलंबित आहेत. हे प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी 21 सप्टेंबरपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर आहेत. औरंगाबादच्या रजिस्ट्री ऑफिसमध्ये मंगळवारी यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला.

मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांचा संपाला प्रतिसाद

रजिस्ट्री ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लोकदेखील रजिस्ट्री करण्यासाठी आले नाहीत. मंगळवारी सकाळी जे लोक आले, त्यांना इथे रजिस्ट्री होणार नाही, असे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील 40 पैकी 35 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जालन्यात पाच जण रजेवर आहेत. तेथे एकूण 27 कर्मचारी आहेत. त्यापैकी 25 जण संपात सहभागी झाले. तर बीड जिल्ह्यातील एकूण 28 कर्मचाऱ्यांपैकी 27 कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे हा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे रमेश लोखंडे आणि आबासाहेब तुपे यांनी केला.

एका दिवसात अडीच कोटींचा फटका

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी दररोज 300 रजिस्ट्री होतात. यातून दोन ते अडीच कोटींचा महसूल जमा होतो. जालन्यात एक कोटी, बीड मध्ये 50 लाख असा साधारण चार कोटींचा महसूल मिळतो. मात्र मंगळवारपासून रजिस्ट्री झाल्या नाहीत. तसेच सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळेही रजिस्ट्रीसाठी लोक येत नाहीत, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात 14 पदे रिक्त

औरंगाबाद जिल्ह्यात नोंदणी व मुद्रांक विभागात कनिष्ठ लिपिकाची सात, सह दुय्यम निबंधकाची सात अशी एकूण 14 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या जागा भरणे तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्यांना 50 लाखांची मदत देण्याचीही मागणी संघटनेने केली आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | औरंगाबादमध्ये दोरखंडाला धरुन नदी पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल

आधी बेस्ट फ्रेंडची रिक्वेस्ट, मग अश्लील व्हिडिओ अन् चॅटिंग, अखेर औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला