जालन्यातील जखमी आंदोलकांना आजच मुंबईत आणणार, प्रकती बिघडली?; अर्जुन खोतकर काय म्हणाले?

जालन्यातील आंदोलकांवर औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हे उपचार सुरू आहेत. मात्र, आता या दोन आंदोलकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

जालन्यातील जखमी आंदोलकांना आजच मुंबईत आणणार, प्रकती बिघडली?; अर्जुन खोतकर काय म्हणाले?
arjun khotkar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 10, 2023 | 1:32 PM

औरंगाबाद | 10 सप्टेंबर 2023 : जालन्यात पोलिसांच्या लाठीमार आणि गोळीबारात जखमी झालेल्या दोन आंदोलकांना आजच्या आज मुंबईत आणण्यात येणार आहे. या आंदोलकांवर पुढील उपचार करण्यासाठी त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे. या दोन्ही आंदोलकांवर गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आज माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी या रुग्णांना भेटून त्यांची चौकशी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या रुग्णांची प्रकृती गंभीर तर नाही ना? अशी शंका या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

जालन्यातील अंतरवली सराटीत जखमी झालेल्या गावकऱ्यांना मुंबईला हलवले जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या छऱ्याच्या फायरिंगमध्ये हे दोन आंदोलक गंभीर जखमी झाले होते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काहींच्या शरीरात अजूनही छर्रे आहेत. हे छर्रे काढणे डॉक्टरांना शक्य झालेलं नाही. त्यामुळे त्यांना मुंबईत हलवले जाणार आहे. मुंबईत या आंदोलकांच्या शरीरातून छर्रे काढले जाणार आहेत. तसेच त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.

कुटुंबीयांची इच्छा

शिंदे गटाचे नेते, माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात जाऊन या जखमींची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबीयांचीही विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आकाश आरवडे आणि शरद कवळे या दोन्ही आंदोलकांना मी भेटलो. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते गंभीर नाहीत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त चुकीचं आहे. हे दोन्ही रुग्ण चालू शकतात. बोलू शकतात. मी त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता मुलांना मुंबईच्या रुग्णालयात शिफ्ट केलं जावं असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा आग्रह असल्याने आम्ही या दोन्ही रुग्णांना मुंबईत नेत आहोत, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

सरकार खर्च करणार

या दोन्ही रुग्णांवर मुंबईत लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात येतील. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारच खर्च करणार आहे. या दोनन्ही रुग्णांना आजच मुंबईला हलवलं जाणार आहे. दोन्ही रुग्णांना कोणताही त्रास नाही. फक्त त्यांची तपासणी करून पुढील उपचार केले जाणार आहेत, असं खोतकर म्हणाले.