सुरतहून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य… शिरसाट यांचा गौप्यस्फोट, कैलास पाटील यांचा थेट पलटवार काय?

संजय शिरसाट यांच्या 'सुरतहून परतणाऱ्या आमदाराचं रामनाम सत्य झालं असतं' या गौप्यस्फोटावर कैलास पाटील यांनी पलटवार केला आहे. मीच तो आमदार असून, घडल्या प्रकाराची गृहखात्याने चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. सत्ता मिळवण्यासाठी राजकारण कोणत्या थराला गेले होते, हे शिरसाट यांच्या विधानातून स्पष्ट झाल्याचे पाटील म्हणाले.

सुरतहून आलेल्या आमदाराचं रामनाम सत्य... शिरसाट यांचा गौप्यस्फोट, कैलास पाटील यांचा थेट पलटवार काय?
kailas patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 1:03 PM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बंडाच्यावेळची माहिती देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुरतच्या बॉर्डरहून परतणाऱ्या आमदाराचं रामनाम सत्य झालं असतं, असा गौप्यस्फोटच संजय शिरसाठ यांनी केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पलटवार केला आहे. तो आमदार मीच आहे. आता शिरसाट यांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. राजकारण कुठल्या थराला जात आहे, हे सरकारने पाहिलं पाहिजे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी कैलास पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.

आमदार कैलास पाटील यांनी संजय शिरसाट यांच्या गौप्यस्फोटावर भाष्य करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आता माझ्या जीवाला धोका नाही. पण कुणाच्या मनात काय आहे किंवा सत्ता मिळवण्यासाठी कोण काय करू शकतं हे कालच्या त्यांच्या विधानाने महाराष्ट्राला कळालं आहे. जीवाची भीती कालही नव्हती आणि आजही नाही. आपण एकदा कसं वागायचं आणि कसं राहायचं ठरवलं तर फिकीर राहत नाही. सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद आहे. तुळजाभवानीचा आशीर्वाद असल्यावर कुणी काही जरी ठरवलं तरी काही होऊ शकत नाही हा आत्मविश्वास होता. आपलं अंतर्मन जे म्हणतंय त्याप्रमाणे आपण वागायचं हे तेव्हाही ठरवलं होतं आणि आजही ठरवलंय. मला त्यावेळीही भीती वाटली नाही आणि आजही वाटत नाही, असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केलं.

Loading...

मुख्यमंत्री हिंमत दाखवणार का?

त्यावेळी ज्या घटना घडल्या, सत्ता मि्ळवण्यासाठी जे प्रकार सुरू होते आणि काही करून त्यांना सत्ता हवी होती हे त्यांच्या विधानातून दिसत आहे. सत्ता मिळवण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकत होते. राजकारणात आजपर्यंत कोणी असा थर गाठला नसेल असं ते करायला तयार होते. काल त्यांच्या विधानातून पहिल्यांदा हे बाहेर आलं. ही गोष्टही समोर आली. आम्ही थांबवलं असं ते म्हणतात. कुणाला थांबवलं? कशासाठी थांबवलं? कोण काय करणार होतं? कुणाचं रामनाम सत्य होणार होतं? या सर्व गोष्टीची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं आहे. त्यामुळे ते चौकशी करण्याची हिंमत दाखवणार का? याचं सत्य समोर येण्याासाठी चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर कुठे गेला आहे हे जनते समोर आलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.

हळूहळू सर्वच बाहेर पडेल

हळूहळू बऱ्याच गोष्टी समोर येतील. थोडासा काळ जाईल. तेव्हा अनेक गोष्टी समजतील. कुणाचा दबाव होता? कसला दबाव होता? त्यावेळी काय झालं? काय काय गोष्टी सत्तांतरासाठी केल्या, या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. या लोकांचं खरं रुप बाहेर येईल, असा दावाही त्यांनी केला.

तक्रार करणार नाही

तुम्ही इतके दिवस या विषयावर का बोलला नाही? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर, मला बोलणं संयुक्तिक वाटलं नाही. हे त्यांच्या तोंडूनच आलं आहे. मी बोललो असतो तर मी खोटं बोलतोय, असं म्हटलं असतं. विरोधक आहे म्हणून बदनाम करतोय असं म्हटलं असतं. पण आता ते स्वत: बोलत आहेत. त्यामुळे काय घडलं याचा अंदाज महाराष्ट्राला आला आहे, असंही ते म्हणाले. तसेच, मी अजून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचं ठरवलेलं नाही. मी काल उद्धव ठाकरेंशी बोललो. ते ठामपणे माझ्या पाठी उभे आहेत. पुढे काय करायचं मी ठरवलं नाही. आज तरी मी निवेदन किंवा तक्रार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते शिरसाट?

दरम्यान, संजय शिरसाट यांनी एका हिंदी पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला होता. सुरतच्या बॉर्डरवरून परत येणाऱ्या आमदाराचं रामनाम सत्य झालं असतं, असे वक्तव्य शिरसाट यांनी कैलास पाटील यांचं नाव न घेता केलं होतं. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता कैलास पाटील यांनी थेट चौकशीची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us