पोरीचं लग्न कसं करायचं? उभा सोयाबीन जळाला… बाप शेतात ढसाढसा रडला; हिंगोलीतच नव्हे…

महाराष्ट्रात दीड महिन्यापासून पाऊसच नसल्याने सोयाबीनसह अनेक पिके जळून खाक झाली आहेत. हिंगोलीतील एका शेतकऱ्याला मुलीच्या लग्नाची चिंता सतावत आहे, कारण पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची हीच व्यथा असून, त्यांना तातडीने सरकारी मदतीची अपेक्षा आहे.

पोरीचं लग्न कसं करायचं? उभा सोयाबीन जळाला... बाप शेतात ढसाढसा रडला; हिंगोलीतच नव्हे...
shivaji vaidya farmer
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 1:41 PM

रमेश चेंडके, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली : गेल्या दीड महिन्यापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनपासून ते कपाशीपर्यंतची सर्व पिके जळून खाक झाली आहेत. या संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. काय करावं आणि काय नाही? अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर आपली गुरंढोरं शेतात सोडली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे हे शेतकरी हतबल झाले आहेत. हिंगोलीतील एका शेतकऱ्याने तर कॅमेऱ्यासमोरच टाहो फोडला. पोरीचं लग्न कसं करायचं? असा प्रश्न या शेतकऱ्याला छळत आहे. फक्त हिंगोलीच्याच शेतकऱ्याची ही व्यथा नाहीये, तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

हिंगोली जिल्ह्यात दीड महिन्यांपासून पावसाने खंड दिल्याने सोयाबीन वाळून गेला आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमकोंडा शिवारात शिवाजी वैद्य ह्या शेतकऱ्यांने पाच एकर शेतात सोयबीन पेरला होता. पण सोयाबीन वाळून गेल्याने त्याने शेतात बैल सोडले आहेत. या शेतकऱ्याकडे 20 बैलं आहेत. चाऱ्या आणि पाण्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे मुलगी लग्नाला आल्याने तिच्या लग्नाचा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

अन् धायमोकलून रडले

शिवाजी वैद्य यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा आपली व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले. कॅमेऱ्यासमोरच हा शेतकरी ढसाढसा रडायला लागला. माझ्याकडे 20 जनावरं आहेत. शेतातलं सर्व पीक करपून गेलं. जनावरांनाही खायच्या लायकीचं राहिलं नाही. सोयाबीन करपून खाक झाला. दीड महिन्यापासून पाऊसच नाही. त्यामुळे पिकं गेली. आमचा खर्च पाण्यात गेला. कर्जही फिटत नाही. पाच एकरमध्ये एक लाखाचा खर्च केला होता. आता हा खर्च कसा निघायचा? त्याचा मोबदलाही मिळत नाही. शेंगा करपून गेल्या. मसूरची डाळही राहिली नाही. जनावरांना कुटार सुद्धा मिळत नाही, अशी व्यथाच शिवाजी वैद्य यांनी मांडली.

लग्न कसं करायचं?

जनावरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांसमोर काय खायला टाकावं आणि त्यांना कुठून पाणी पाजावं असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. आमचं सोयाबीन गेलं आहे. पैसा गेला. सोयाबीनवरच आमचा दिवाळी आणि दसरा अवलंबून आहे. मुलगी लग्नाला आली आहे. मुलीचं लग्न कसं पार पाडायचं याचं टेन्शन आलं आहे, असं म्हणताना या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

एकरी 40-50 हजार रुपये द्या

आमचं म्हणणं आहे की सरकारने काही तरी मोबदला लवकर द्यावा. माझीच नाही, सर्वांचीच शेती गेली आहे सर. शेंगही हाती लागत नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला एकरी 40 ते 50 हजार रुपये आर्थिक मदत केली पाहिजे, असं वैद्य म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us