औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित

जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा राज्यात डंका, महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट म्हणून घोषित

औरंगाबाद: महाराष्ट्र पोलीस महासंचलनालय (Maharashtra police) यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा मान औरंगाबादच्या ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला मिळाला आहे. जानेवारी-2020 ते डिसेंबर-2020 या कालावधीतील कामगिरीचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हा मान औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आला आहे. या काळात ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील(Mokshada Patil)  यांच्या नेतृत्वात औरंगाबाद ग्रामीण युनिटचे काम चालले. नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल मोक्षदा पाटील मॅडम आणि संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तीन श्रेणींमध्ये पोलीस दलांचे विभाजन

राज्य पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता, कामगिरी, गुन्हेगारीला आळा, गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे इत्यादी मापदंडांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार सकारात्मक, नकारात्मक मापदंडांच्या आधारे श्रेणी तयार करण्यात येतात. राज्यातील घटक कार्यालयांची जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत A,B,C अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. त्यानुसार A श्रेणीत 24 घटक कार्यालये तर B श्रेणीत 24 घटक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. या विविध श्रेणींतून मूल्यांकन समितीद्वारे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाची प्रथम क्रमांकावर निवड केली आहे. या कार्यकाळात ग्रामीण पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या निवडीचे श्रेय जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले असून त्यांचेही कौतुक केले.

औरंगाबाद पोलीस दलातील नवे बदल

दरम्यान, गृहविभागामार्फत झालेल्या नव्या बदल्यांनुसार, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिस अधीक्षक पदावर मुंबई येथील पोलीस उपायुक्त निमित गोयल यांची बदली करण्यात आली आहे. तर मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलिस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे. तसेच राज्यीतल पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील मीना मकवाना आणि निकेश खाटमोडे पाटील यांचीही बदली करण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जागी उज्ज्वला वनकर आणि अपर्णा सुधाकर गिते यांची नियुक्ती करण्यात आली.

इतर बातम्या- 

औरंगाबाद पोलिस दलात दिसणार ‘महिलाराज’, नव्या बदल्यांनुसार पाच प्रमुख पदावर महिला पोलिस अधिकारी

अखेर ‘त्या’ रिक्षाचालकाच्या मुसक्य़ा आवळल्या, चालत्या रिक्षात तरुणीला छेडणं महागात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI