वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अजब फंडा, औरंगाबादेत थ्री फेज खंडित, सिंगल फेजने पुरवठा, शेतकरी अडचणीत

| Updated on: Nov 21, 2021 | 2:08 PM

कृषी पंपांसाठी असलेल्या थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करुन सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सिंगल फेजवर कृषीपंप सुरु होत नसल्याने पिके तसेच गाळपासाठी आलेल्या उसाने नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अजब फंडा, औरंगाबादेत थ्री फेज खंडित, सिंगल फेजने पुरवठा, शेतकरी अडचणीत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः वाळूज परिसरातील कृषीपंपधारक शेतकरी ग्राहकांकडून वीज बिल वसुलीसाठी महावितरणने अजब वसुली फंडा वापरला आहे. या ग्राहकांकडे जवळपास 23 कोटी रुपये थकीत आहेत. ही थकीत रक्कम वसुलीकरिता महावितरण थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करून सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सिंगल फेजवर कृषीपंप चालत नसल्याने ऊस पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

2 हजार शेतकऱ्यांची जोडणी, थकबाकीचा आकडा वाढलेलाच

वाळूज सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या वाळूज, शिवराई, नारायणपूर, नायगाव, बकवाल नगर, जोगेश्वरी, घाणेगाव आदी गावांतील जवळपास 2 हजार शेतकऱ्यांनी महावितरणकडून कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. बहुतांश कृषीपंपधारक शेतकरी बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. कृषीपंपधारक ग्राहकांना महावितरणकडून सूचना देऊन तसेच जनजागृती करून 3 एचपीचा वापर असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी किमान 5 हाजर, 5 एचपीसाठी 7 हजार 500 रुपये, 7.5 एचपीसाठी 10 हजार रुपये व 10 एचपीसाठी किमान 15 हजार रुपयांचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थ्री फेजऐवजी सिंगल फेजने पुरवठा सुरु

वाळूज परिसरातील 1922 कृषीपंपधारक वीज ग्राहकांकडे 23 कोटी 26 लाखांची थकबाकी असल्याचे सहाय्यक अभियंता प्रणित खंडागळे यांनी सांगितले. बिलाचा भरणा करण्यास शेतकरी उदासीन असल्याने महावितरणकडून शुक्रवारपासून कृषी पंपांसाठी असलेल्या थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करुन सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सिंगल फेजवर कृषीपंप सुरु होत नसल्याने पिके तसेच गाळपासाठी आलेल्या उसाने नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

इतर बातम्या- 

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल