फुकटचा पगार घेणाऱ्या शिक्षकांविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी थोपटले दंड; ‘या’ दिवशी काढणार मोर्चा

| Updated on: Aug 24, 2023 | 1:59 PM

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी काही भ्रष्टाचारी शिक्षकांविरोधात दंड थोपटले आहेत. मुख्यालयी न राहता पगार घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

फुकटचा पगार घेणाऱ्या शिक्षकांविरोधात आमदार प्रशांत बंब यांनी थोपटले दंड; या दिवशी काढणार मोर्चा
prashant bamb
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 24 ऑगस्ट 2023 : मुख्यालयी न राहता फुकटचा पगार घेणाऱ्या शिक्षकांविरोधात भाजपचे आमदार प्रशांत बंब चांगलेच आक्रमक झाले आहेत. या शिक्षकांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णयच बंब यांनी घेतला आहे. येत्या शिक्षक दिनी या कामचुकार आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांविरोधात मोर्चा काढण्याची घोषणाच प्रशांत बंब यांनी केली आहे. बंब यांनी या शिक्षकांचा प्रश्न विधानसभेतही मांडला होता. आता त्याला आंदोलनाची जोड दिली जात आहे. त्यामुळे मुख्यालयी न राहता पगार घेणार्या शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

शिक्षक दिनीच आमदार प्रशांत बंब काढणार शिक्षकांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेवर प्रशांत बंब हा मोर्चा काढणार आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं बंब यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो पालक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा मोर्चा काढला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

मागण्या काय?

शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, शिक्षकांनी मुख्यालयी राहणे, मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करणे आदी प्रमुख मागण्या या मोर्चात केल्या जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपण स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केल्याने येणाऱ्या काळात आमदार बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष पेटण्याची चिन्हे व्यक्त केली जात आहे.

गोठ्यात राहण्याचं प्रमाणपत्र

राज्यातील 80 टक्के शिक्षक भ्रष्ट आहेत. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करण्यात आला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी 17 वेळेस पत्र लिहिलं आहे. शिक्षकांची गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत त्यांची पगार वाढ रोखण्याची मागणी मी केली आहे. अनेक शिक्षकांनी घरभाड्यासाठी गोठ्यात राहत असल्याचे प्रमाणपत्र दिलं आहे. अशा शिक्षकांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

पे कमिशन देऊ नका

राज्यातील अनेक शिक्षक आपल्या पेशबाबत भ्रष्ट आहेत. अनेक शिक्षकांनी घरे भाडे लाटण्यासाठी शेळ्या आणि म्हशीच्या गोठ्याचे भाडे करार दिले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण न देणाऱ्या शिक्षकांना पगारवाढ अर्थत पे कमिशन देण्यात येऊ नये. शिक्षकांना स्वतःची गुणवत्ता चाचणी परीक्षा द्यावीच लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.