मराठा समाजाला कोण उल्लू बनवतंय?; मनोज जरांगे पाटील यांचा थेट नाव घेऊन आरोप

उद्या मी सुट्टी घेणार असून गावाकडे उपचार घेणार आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये बसून काहीच काम होत नाही. त्यामुळे मी अंतरवलीला जाणार असून तिथेच उपचार घेणार आहे. तिथूनच माझी सर्व सूत्रे हलवणार आहे. समाजातील लोकांशी चर्चा करणार असून रणनीती ठरवणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मराठा समाजाला कोण उल्लू बनवतंय?; मनोज जरांगे पाटील यांचा थेट नाव घेऊन आरोप
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 27, 2024 | 10:29 AM

अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले अन् उपोषणेही केली. सरकारला डेडलाईनवर डेडलाइन दिल्या पण मराठा समाजाला काही आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला कोण उल्लू बनवतंय याची माहितीच जरांगे यांनी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांनी हा आरोप करून एक प्रकारे सत्ताधारी आणि विरोधकांवर अविश्वासच दाखवला आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. ही फक्त घुमावघुमवी आहे. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम आहे. या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे. आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर काही करता येतं, मनात असेल तर देता येते, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

सगळे वेड्यात काढत आहेत

त्यांनी लाईव्ह बैठक घेण्यापेक्षा डोंगरावर जाऊन मोठ्याने बोलावं आणि त्याचं लाईव्ह प्रेक्षेपण करावं. यांच्या कुठेही भेटी होतात. मात्र आरक्षणासाठी बोलत नाहीत. तेवढं त्यांना जमत नाही आणि म्हणतात आम्ही लाईव्ह करायचं. 70 वर्षापासून सगळे वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनांत अती खदखद आहे. लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवतंय. विरोधक आणि सत्ताधारी हे मराठ्यांना उल्लू बनवत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

समाजाने हमाल्याच करायच्या का?

मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही. समाजाला काही माहिती हवी असेल किंवा राजकीय नेत्यांना काही माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. नेते म्हणाले आम्हाला काही माहीत नाही तर सर्व त्यात आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणाऱ आहेत. माझ्या समजाने नेत्यांच्या हमाल्याच करायच्या का? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे नाटक करत आहेत. समाजात गोंधळ आणि गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र सुरू आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठीच हा चालूपणा आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

यांचा जीव खुर्चीत

सत्ताधारी आणि विरोधक हे कुणाचेही नाहीत. न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकत्रित या. आमचा जीव आरक्षणात आहे. यांचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण नाही दिले तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

एकाचे दोन सांगतात

यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं. मला त्यांच्यावर बोलायचं नाही. आमचं ध्येय आरक्षण मिळविणं आणि पाडापाडी करणं आहे. त्यांच्या आजू बाजूचे लोक त्यांना समजावून सांगत नाहीक, जवळील लोक एकाचे दोन सांगतात. फुकटात निवडून येणारे मिसगाईड करतात. मागील दाराने लोक गैरसमज निर्माण करतात. पण हे मराठ्यांच्या लाटेत होरपळून जाणार आहेत. नेत्याला खुश करावे लागते, अन्यथा दुसऱ्या वेळी मिळत नाही. मूळ मालकाचा कार्यक्रम असतो. असं अनेकदा घडतं, असा टोला त्यांनी लगावला.