Weather: थंड वाऱ्यांनी गारठलं औरंगाबाद, मराठवाड्यातील सर्वात कमी तापमान, काय सांगतोय आजचा अंदाज?

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यसह देशातील अनेक राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस होत आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर शीतवारे वाहत आहेत. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Weather: थंड वाऱ्यांनी गारठलं औरंगाबाद, मराठवाड्यातील सर्वात कमी तापमान, काय सांगतोय आजचा अंदाज?
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः गुरुवारी शहर आणि परिसरातील वातावरणात कमालीचा गारठा जाणवला. जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर काळे ढग, कुठे हलका तर कुठे मुसळधार पाऊस, असे चित्र दिसून आले.  औरंगाबाद शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड गारठ्याचा अनुभव आला. औरंगाबादचे दिवसाचे तापमान 21.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले तर किमान तापमान 7.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले.

सूर्यदर्शन नाहीच, रस्त्यावर तुरळक वाहने

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून सूर्यदर्शनच झाले नाही. त्यातच बुधवारी आणि गुरुवारी अति प्रमाणात गारठा वाढून गेला. बुधवारच्या पावसामुळे गुरुवारी अधिकच थंडी जाणवू लागली. त्यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागला. गरजेचे काम असेल त्याच नागरिकांनी गुरुवारी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पण तुरळक प्रमाणात वाहने दिसून आली.

चहा, मसाला दूधाच्या स्टॉलवर गर्दी

मागील काही दिवसांपासून अचानक गारवा वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. मात्र कामासाठी बाहेर पडणे आवश्यकच असलेल्या चाकरमान्यांनी रस्त्यावरील चहाचे स्टॉल गाठल्याचे चित्र दिसून आले. तसेच संध्याकाळी मसाला दूधाच्या स्टॉलवरही गर्दी दिसून आली.

मराठवाड्याचाही पारा घसरला

चिकलठाणा वेधशाळेच्या गुरुवारी संध्याकाळच्या नोंदीनुसार, गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी तापमान दिसून आले. त्यानंतर बीडचे किमान तापमान 17.0 तर कमाल तापमान 28.0 एवढे नोंदवले गेले. तसेच लातूरचे किमान तापमान 20.1 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 27.2 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. उस्मानाबादचे किमान तापमान 19.4 तर कमाल तापमान 30.0 अंश सेल्सियस एवढे नोंद झाले. त्यानंतर परभणीचे किमान तापमान 17.5 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 31.1 अंश सेल्सियस, उदगीरचे कमाल तापमान 27.0 तर किमान तापमान 18.0 एवढे नोंदवले गेले. जालना जिल्ह्याचे किमान तापमान 19.7 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 25.4 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले.

6 डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज

मराठवाड्यात गुरुवारी कुठे ढगांचे अच्छादन, कुठे पाऊस तर कुठे अत्यंत शीत वारे वाहत आहेत. यामुळे दिवसाचे तापमान 7 अंशांनी घसरले. पुढील तीन दिवस म्हणजे, 3, 4, 5 डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात असेच तापमान राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मराठवाड्यातील औरंगाबादसह जालना, बीड , लातूर, उस्मनाबाद, परभणी, हिंगोली ,नांदेड आदी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील तसेच शीत वाऱ्यांमध्ये येत्या काही दिवसात अधिक वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

ऊबदार कपडे, पौष्टिक अन्नाचे सेवन करा

मराठवाड्यात सध्याचे दमट आणि शीत हवामान आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी, पोषक आहार सेवन करावा. बाहेरचे तेलकट पदार्थ टाळावेत. ताज्या भाज्या, ताजे अन्न सेवन करावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

इतर बातम्या-

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून

Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI