शेतकरी कर्जमाफीची घोषणा होताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, बोलावली महत्त्वाची बैठक

Bacchu Kadu : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया, बोलावली महत्त्वाची बैठक
bacchu Kadu
Image Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2026 | 9:15 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

मी सरकारचे आभार मानतो – बच्चू कडू

काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. आज सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, ‘देवा भाऊंनी आज कर्जमाफीची घोषणा केली त्यांचे मी आभार मानतो, पण त्यामध्ये काही त्रुटी आहे. खरं तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे होती. दुष्काळात होरपळलेल्या चालू कर्जदारांची कर्जमाफी झाली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजे.’

बच्चू कडू यांनी बोलावली बैठक

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘आम्ही कर्जमाफीसाठी मुंबईला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली. त्या टीकाकारांना आता उत्तर मिळला आहे, कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कर्जमाफी पासून दूर जाणाऱ्या सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला आम्ही भाग पाडले. 14 किंवा 15 तारखेला राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यासह सर्व शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेणार आणि सरकार समोर कसं जायचं याचा विचार करू.’

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला – राजू शेट्टी

सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलं की, ‘शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मेटाकुटीला आलेला शेतकरी दोन लाखांच्या वरची रक्कम कशी भरणार हा प्रश्न आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे जो शेतकरी नियमित कर्ज भरत होता तो देखील आता थकीत झाला आहे. सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे असा प्रश्न पडतो.’

 

Follow Us