बच्चू कडूंची बळीराजाला साथ; शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून दिल्लीकडे कूच

| Updated on: Dec 04, 2020 | 10:44 PM

बच्चू कडू यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) दुचाकीने दिल्लीकडे कूच केले आहे. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत.

बच्चू कडूंची बळीराजाला साथ; शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून दिल्लीकडे कूच
Follow us on

अमरावती : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महिला आणि बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) दुचाकीने दिल्लीकडे कूच केले आहे. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत. (Bacchu Kadu going to Delhi by bike for supporting the farmers)

केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

बच्चू यांचे दिल्लीकडे कूच

बच्चू कडू जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत. गुरुकुंज मोझरी ते दिल्ली असा प्रवास ते दुचाकीने करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते तसेच शेतकरीही आहेत. दिल्लीकडे दुचाकीने जाणार आहेत. अमरावतीहून थेट दिल्लीला जाऊन ते दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविणार आहेत.

पंतप्रधानांना शेतकऱ्यांची भेटायला वेळ नाही

दरम्यान, “शेतकऱ्यांना भेटायला पंतप्रधान, सरकार यापैकी कुणालाही वेळ नाही. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही; तोपर्यंत आम्ही दिल्लीला आंदोलन करु,” असे बच्चू कडू 2 डिसेंबर रोजी म्हणाले होते. तसेच, यावेळी त्यांनी शुक्रवारी (4 डिसेंबर) अमरावती येथून दुचाकीवरून मोर्चाला सुरुवात करण्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्रातून हा मोर्चा नेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन करू, असेही त्यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या :

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस, राज्यात शेतकरी संघटनांचं उग्र आंदोलन, तर प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा एल्गार

PHOTO | दिल्लीत आंदोलनाचा सातवा दिवस; शेतकरी काय खातात, कुठे झोपतात?

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही शेतकरी संघटनांचा राज्यव्यापी एल्गार, 3 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

(Bacchu Kadu going to Delhi by bike for supporting the farmers)