
राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाली, पावसानं चांगलंच झोडपून काढलं, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. राज्यातील अनेक भागांमध्ये तर शेतीची माती देखील वाहून गेली, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजी घोषणा केली होती, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी राज्यात सध्या सुरू आहे, यावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आपल्या मागण्यासाठी त्यांनी राज्यभरात दौरे केले, त्यापूर्वी त्यांनी उपोषण देखील केलं होतं.
दरम्यान बच्चू कडू यांनी राज्यभर दौरे केल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलनाची हाक दिली, या आंदोलनाला प्रचंड गर्दी जमली होती. बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ सोडावे असे आदेश कोर्टाने बुधवारी दिले होते, मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं, पोलिसांनी आम्हाला एक तासाच्या आत अटक करावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलनस्थळी येऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. दरम्यान जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल रोखो करू असा इशाराही त्यांनी दिला होता.
त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसोबतच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. अखेर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे.
कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारने जीआर काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत समितीला कर्जामाफिसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती आहे.