Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या अपमानावरून मुंबईत राजकीय संघर्ष! महापौरांना घेरलं, केबिनमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा
Balasaheb Thackeray Photo Insult Row: बाळासाहेबांच्या फोटो फाडल्याप्रकरणी मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहे. महापौरांच्या कॅबिनमध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अपमान झाल्याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबई महापालिकेपासून ते नाशिकपर्यंत या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. मुंबईत विरोधकांनी थेट महापौरांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारला. तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मुंबई महापालिकेत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी महापौरांना धारेवर धरलं. बाळासाहेबांचा अपमान झालेला असताना सभागृहाचं कामकाज सुरू का ठेवलं? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून महापौरांच्या कॅबिनमध्ये विरोधकांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कॅबिनमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. महापौरांना समर्थन देण्यासाठी भाजपचे नगरसेवकही कॅबिनमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजप नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक आमनेसामने आले.
दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने महापौरांच्या कॅबिनमध्ये जोरदार गोंधळ निर्माण झाला. काही वेळातच वातावरण चांगलंच तापलं. या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर एकनाथ शिंदे यांचा फोटो फाडण्याचा इशाराही मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणावरून नाशिकमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेत्या शायना एनसी या विधानभवनात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेबाबत त्यांना बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात शायना एनसी यांची भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
एकूणच बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या कथित अपमानावरून मुंबई आणि नाशिकमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. महापालिकेतील गोंधळ, मनसेची घोषणाबाजी आणि विधानभवनातील घडामोडींमुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या घटनेमुळे चर्चांना उधाण आले आहे. यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, बाळासाहेबांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. सभा तहकूब करा, अशी पेडणेकरांनी मागणी केली होती. पण सभागृह तहकूब होणार नाही, असं आम्ही विरोधकांना सांगितलं. सभागृह तहकूब न केल्याने विरोधकांकडून वॉकआऊट करण्यात आलं, असं रितू तावडे म्हणाल्या आहेत.
