वांद्रे किल्ल्यावरील ओली फेस्ट पार्टीत आशिष शेलार? फोटो ट्विट करत जोरदार हल्ला

वांद्रे किल्ल्यावरील दारूपार्टीचा वाद आणखी पेटला आहे. ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पार्टीतील उपस्थितीचा फोटो शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. 48 तासांनंतरही कारवाई न झाल्याने चित्रे यांनी किल्ले संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

वांद्रे किल्ल्यावरील ओली फेस्ट पार्टीत आशिष शेलार? फोटो ट्विट करत जोरदार हल्ला
वांद्रे किल्ल्यावरील ओली फेस्ट पार्टी वादात
| Updated on: Nov 18, 2025 | 11:13 AM

मुंबईतील वांद्रे येथील एका किल्ल्यावर झालेल्या दारूपार्टीचा व्हिडीओ समोर आल्यावर वातावरण तापलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विटरवर याचा फोटो पोस्ट केला होता. ‘महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? असा सवाल विचारत त्यांनी या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर वातावरण चांगलं तापलं. आता त्याच अखिल चित्रे यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यामुळे तर नवा वाद निर्माण होण्याचीच चिन्हे आहेच. ‘वांद्रे किल्ल्यावरील
@maha_tourism प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना? आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात’ असं म्हणत त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा फोटो पोस्ट केला होता. ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही, हे आता समजलं असेलच असाही टोला त्यांनी हाणला. यामुळे राज्यातलं वातावरण आता पेटू शकतं.

काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी अखिल चित्रे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीची दृश्य त्यामध्ये दिसत होती. तो व्हिडीओ शेअर करतानाच अखिल चित्रे यांनी एक लांबलचक पोस्ही लिहीली होती. ” महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी?

सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे… हेच @BJP4Maharashtra भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती ! #Daruparty #BandraFort ” – असं त्यांनी या संदर्भात लिहीलं होतं.

आज त्यांनी पुन्हा याच मुद्यावरून आणखी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक फोटोही पोस्ट केला असून त्यात भाजपचे नेते, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारही दिसत असून, तोच धागा पकडत चित्रे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले अखिल चित्रे ?

वांद्रे किल्ल्यावरील @maha_tourism प्रस्तुत ओली फेस्ट दारुपार्टीची दृश्य पाहून संताप आला होता ना? आता हा पहा अजून एक फोटो. त्याच इव्हेंटला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विशेष उपस्थिती लावतात. आता समजलं असेलच, ४८ तास उलटले तरी का कुणावर कारवाई झाली नाही. ‘किल्ले अडवा, अड्डे बनवा’ हे नवं धोरण सांस्कृतिक मंत्रालयाने हाती घेतलं आहे वाटतं ! @ShelarAshish हेच का सांस्कृतिक वारसा संवर्धन? @CMOMaharashtra अशा पार्टीला राज्याचे मंत्रीच विशेष पाहुणे असतील तर पोलीस, @excise_state कारवाई करतील का ? असा सवाल त्यांनी या ट्विटमध्ये विचारला आहे.

 

त्यांचं हे ट्विट आणि फोटो, यामुळे येत्या काळात या मुद्यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.