बारामती पोटनिवडणुकीत टि्वस्ट, रोहित पवार अचानक काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या भेटीला, पडद्यामागचा खरा गेम काय?

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत विनंती केली, तसेच पार्थ पवारांच्या विधानावर दिलगिरीही व्यक्त केली आहे.

बारामती पोटनिवडणुकीत टि्वस्ट, रोहित पवार अचानक काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या भेटीला, पडद्यामागचा खरा गेम काय?
harshwardhan sapkal rohit pawar
| Updated on: Apr 09, 2026 | 9:35 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असतानाच, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. रोहित पवार यांनी नुकतंच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसला बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संवाद साधला. रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या बंद दाराआड झालेल्या या चर्चेत रोहित पवार यांनी काँग्रेसला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. अजित दादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक भावनिक स्तरावर पाहणे गरजेचे आहे,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

मी आता सपकाळांशी बोलत असताना त्यांनी मला त्यांची स्पष्ट भूमिका सांगितली आहे. एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्याच्या नेत्यासाठी एफआयआर होत नसेल, तसेच ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे ती गती मिळत नसेल तर मग या महाराष्ट्रात शासन आणि प्रशासन सामान्य माणसांना कसा न्याय देणार असं मत काँग्रेसने मांडलं. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवारी दिली आहे, असे रोहित पवार म्हणाले.

काँग्रेस हा पक्ष आमच्या पक्षापासून वेगळा आहे. त्यांचे विचार, धोरणं ही पक्की असतात. तरीही मी विनंती केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर काँग्रेसध्येही अंतर्गत चर्चा होत आहे, असे मला जाणवतंय. पण त्यांनी उमेदवारी देऊन अजितदादांना न्याय द्या हा एक जो संदेश दिला आहे, तो फार महत्त्वाचा आहे. पण तरीही आज शेवटचा दिवस आहे. कुटुंबातील एक व्यक्ती, दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली आहे, अशीही माहिती रोहित पवारांनी दिली.

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून दिलगिरी

दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नाराजी पसरली होती. “पार्थचे विधान चुकीचे होते आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले.

Follow Us