मुंडेंसोबत आरोपीचा फोटो, क्षीरसागरांवर गंभीर आरोप, बीडच्या विनयभंग प्रकरणाची A टू Z माहिती!

बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, असे विचारले जात आहे.

मुंडेंसोबत आरोपीचा फोटो, क्षीरसागरांवर गंभीर आरोप, बीडच्या विनयभंग प्रकरणाची A टू Z  माहिती!
BEED GIRL STUDENT MOLESTATION CASE (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jun 30, 2025 | 3:02 PM

Beed Private Coaching Classes Student Molestation Case : बीड जिल्हा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे हा जिल्हा राज्याभरात चर्चेत होता. याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक कराड याचे नाव आल्यानंतर मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत बीड जिल्ह्यातील अनेक हत्याकांडाची प्रकरणं समोर आली. दरम्यान, आता अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी भाजपाचे नेते तथा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर मुंडे यांचेदेखील आरोपीसोबतचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे विनयभंगाचे हे प्रकरण नेमके काय आहे, हे समजून जाणून घेऊ या…

विनयंभगाचा प्रकार 27 तारखेला आला समोर

जून महिन्याच्या 27 तारखेला बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांच्या पिंक पथकाकडून तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणाची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली होती. महिला आयोगाने बीडच्या पोलीस अधीक्षकांना या संदर्भात एक पत्र पाठवून उमाकिरण क्लासेसची इमारत सील करण्यासंदर्भात आणि सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकं रवाना

पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून कथितपणे विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर 27 जून रोजीच आरोपी प्राध्यापकांच्या शोधासाठी पोलिसांची काही पथकं रवाना झाली होती. या प्रकरणी दरम्यान बीडच्या शासकीय विश्रामगृहात पालकांसह काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर 28 जून रोजी बीड जिल्ह्यातील शैक्षणिक संकूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

धनंजय मुंडे यांचे संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप

राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. संदीप क्षीरसागर यांचे या प्रकरणातील आरोपीसोबत फोटो आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. हे आरोप करताना त्यांनी थेट पत्रकार परिषदच घेतली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आरोपीसोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

आरोप प्रशांत खाटोकर, विजय पवारला अटक

हे प्रकरण फारच चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर 29 जून रोजी अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी फरार असलेल्या दोन शिक्षकांना अखेर अटक करण्यात आली. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथून विजय पवार याला तर प्रशांत खाटोकर याला चौसाळा या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. विजय पवारला एका कारमधून पलायन करतानाच शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करून या दोघांना बीड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी

ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयासमोर चालवावे अशी मागणी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी हे कृत्य केल्याने यातून चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जलद गती न्यायालयामध्ये ते चालवावे तसेच या प्रकरणातील आरोपी असलेल्यांचा आका कोण? याचा देखील शोध घ्यावा अशी मागणी सानप यांनी केली 29 जून रोजी केली.

आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

न्यायालयाने 29 जून रोजी आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यानंतर आता आमदार धनंजय मुंडे आणि या प्रकरणातील आरोप विजय पवार याचे एकत्र असतानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात चर्चांना उधाण आलंय.