
बीड जिल्ह्यातील गेवराईमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी नर्तकी पूजा गायकवाडला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. त्यातच आता गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बर्गे कुटुंबियांकडून नर्तकी पूजावर विविध आरोप करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नर्तिका पूजा गायकवाडला बर्गे यांनी दीड गुंठ्याचा प्लॉट खरेदी करून दिल्याचा दावा केला होता. आता या दाव्याला पुष्टी देणारा एक पुरावा टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. त्यामुळे नर्तिका पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर बर्गे कुटुंबियांनी नर्तकी पूजा गायकवाडवर विविध आरोप केले होते. बर्गे यांनी पूजा गायकवाडला लाखो रुपयांचे दागिने घेऊन दिले. त्यासोबतच तिला प्रत्येकी दोन लाख रुपयांचे महागडे मोबाईल फोन दिले आहेत. तसेच तिला बार्शीजवळील वैरागमध्ये दीड गुंठ्याचा एक प्लॉटही बर्गे यांनी दिला होता, असा दावा बर्गे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. आता त्यांच्या या दाव्याला पुष्टी देणारी कागदपत्रे समोर आली आहेत.
टीव्ही ९ मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आलेल्या प्लॉटच्या खरेदीखताच्या (रजिस्ट्री) कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचे नाव दिसत आहे. तसेच त्यावर त्यांचीही सही देखील पाहायला मिळत आहे. यामुळे, पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यातील आर्थिक व्यवहारांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. तसेच बर्गे कुटुंबियांनी केलेल्या दाव्याला कायदेशीर कागदपत्रांचा आधार मिळाला आहे.
सध्या ही कागदपत्रे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानले जात आहेत. आतापर्यंत पोलिसांकडे केवळ बर्गे कुटुंबियांनी दिलेली माहिती होती. पण या खरेदीखतामुळे पोलिसांना कायदेशीर तपास करण्यासाठी एक ठोस आधार मिळाला आहे. या पुराव्यामुळे पोलिस तपासाला वेग येणार आहे. तसेच अनेक अनुत्तरित कोडी यामुळे सुटतील, असे बोललं जात आहे. सध्या याचा पोलीस तपास करत असून या नव्या पुराव्यामुळे पूजा गायकवाडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता याप्रकरणी कोणकोणते नवीन खुलासे होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद बर्गे यांच्या मेव्हण्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात प्रेमसंबंध होते. पूजाने बर्गे यांच्याकडे गेवराईतील बंगला आणि पाच एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली होती. या गोष्टींमुळे गोविंद बर्गे मानसिक तणावात होते. यानंतर त्यांनी आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून सध्या याची सखोल चौकशी सुरू आहे.