संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, एका कारणामुळे डाव फसला; धनंजय देशमुखांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन खुलासे झाले आहेत. त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत की, संतोष यांचा मृतदेह कळंबकडे वळवण्याचा प्रयत्न झाला होता. एक महिलावर अत्याचार करून हत्या दाखवण्याचा कट होता, असा दावा केला आहे.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. याप्रकरणी विविध आरोप प्रत्यारोप होत असताना आता संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत.
धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता. एका महिलेकडे घेऊन जायचं. छेडछाड झाली, कपडे फाडून घेतले असते, अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसाने असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं, असा त्यांचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
…म्हणून तो प्लॅन फसला
“संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता, असा दावा केला जात आहे. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अधिवेशनात सुरेश धस यांनी हा मुद्दा मांडला. त्यावेळेस त्यांनी ही माहिती सांगितली होती. पोलिसांनी भावाला जिथून घेतलं होतं, ती गाडी चिंचोलीला आली. चिंचोली फाट्याजवळ एक रस्ता केजकडे येतो आणि एक रस्ता कळंबकडे जातो. कळंबच्या दिशेने ती गाडी वळून जात होती. पण गावातल्या एक – दोन गाड्या पोलीसच्या पाठीमागे होत्या, हे पोलीसच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस गाडीचा टर्न घेऊन त्यांना केजच्या रुग्णालयात घेऊन आले”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“कोण पोलीस होते ते समजू शकलं नाही”
“या गुन्हेगारी टोळीचा जो मुख्य आहे त्यांचा प्लॅन असा होता की, एका सरपंचाची हत्या झाली आहे. त्याला एका महिलेकडे घेऊन जायचं. अगोदर त्यांचा प्लॅन होता तसा, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा यांनी सोडलं नाही. हे त्या महिलेकडे जाऊन त्या ठिकाणी सोडणार होते. छेडछाड झाली, त्या ठिकाणी कपडे फाडून घेतले असते, अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसाने असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं. आज निषेध व्यक्त केले असते सगळ्यांनी, अशी घटना घडली चांगल्या माणसाकडून असा त्यांचा प्लॅन होता. कट करणारा मुख्य होता. कट कारस्थानात सहभागी असणारी पोलीसची गाडी होती, त्यात कोण पोलीस होते ते समजू शकलं नाही”, असेही धनंजय देशमुख म्हणाले.
आम्हालाही ही गोष्ट रात्री लगेच कळाली
“महिलांनी आरोप करायचे आणि त्यातून हत्या झाली होती असं दाखवायचं होतं. पण नशीब त्यातील दोन गाड्या गाडीच्या पाठीमागे होत्या म्हणून हे त्यांना साध्य करता आलं नाही. आम्हालाही ही गोष्ट रात्री लगेच कळाली. अण्णाने इथली माहिती घेऊन सभागृहात मांडलं होतं. पहिल्या आठ दिवसाची पुन्हा चौकशी करुन याची आम्हाला माहिती घ्यायची आहे. पोलिसांनी सीआयडी आणि एसआयटीला काय माहिती दिली आहे”, असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला.
“CDR मध्ये स्पष्ट आहे”
“हे पण त्यांच्या प्लॅनमध्ये होतं. 100 टक्के प्लॅनमध्ये होतं. ते प्री प्लॅन करून ते सगळं करतात. विदाऊट प्री प्लॅन करत नाहीत. गाडीत हत्यार टाकायचं हे नवीन नाही हे जर नवीन असेल तर आरोपी एक दोन दिवसात सापडले असते. जे CDR आले आहेत त्यामध्ये स्पष्ट आहे. त्यांच्या मुख्य माणसाचे 50 – 60 फोन आहेत. त्या दोन-चार दिवसात, हे कशासाठी कोणत्या कारणासाठी? चहा प्यायला आरोपी जातोय, त्यानंतर पोलीस स्टेशनच्या मोठ्या कॅमेरा एक तास बोलत बसतोय कट शिजवण्यासाठीच, दुसरं काय काम आहे त्यांचं”, असेही धनंजय देशमुख म्हणाले.
ज्या इकडे आल्या नाहीत, त्या येणार आहेत
“त्यांचा काय प्लॅन होता तो साध्य झाला नाही, त्यांचा प्लॅन त्यांच्याजवळ राहू द्या. जो खून झाला आहे त्याचा आम्हाला नाही पाहिजे. आता जर तर त्याच्यामध्ये दुसरा विषय पुढे घेऊन जाऊ नका, तसं काही दुर्दैवानं झालं नाही, त्यांचे काय प्लान होते यावर डोकं लावणं चुकीच आहे. आम्हाला याचा पुन्हा तपास करायचा आहे. त्यांनी सीआयडीला काय तपास दिला आणि आता मला नवीन अधिकार्याकडून काय मिळणार आहे. आम्ही आमच्या स्तरावर ती चौकशी करून घेणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी ज्या इकडे आल्या नाहीत, त्या येणार आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असेही धनंजय देशमुखांनी सांगितले.