फोन ठेवल्यानतंर संतोष देशमुखांचे ‘ते’ वाक्य, वैभवी देशमुखच्या जबाबातून मोठा खुलासा समोर
संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या मुली वैभवी देशमुखने महत्त्वाचा खुलासा केला आहे. हत्येपूर्वी संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात १०-१२ मिनिटे फोनवर संवाद झाला होता, असे तिने सांगितले.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी आणि सीआयडीकडून कसून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी चौकशी करण्यात आली होती. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तिने एक धक्कादायक माहिती दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वैभव देशमुखने नुकतंच जबाब नोंदवला. यावेळी तिने संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वडिलांचा आणि विष्णू चाटेचा संवाद झाल्याचे तिने सांगितले. लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता, असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता, असे वैभवी देशमुखने जबाबात सांगितले आहे. विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यातील संवाद १० ते १२ मिनिटे चालला, असेही तिने यावेळी म्हटले.
विष्णू चाटे आणि संतोष देशमुखांचा १०-१२ मिनिटे संवाद
वैभवी देशमुखने नोंदवलेल्या जबाबानुसार, संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवरुन संभाषण झाले होते. संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर १० ते १२ मिनिटे संवाद चालला. लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता, असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता. हा फोन विष्णू चाटेचाच होता, असं संतोष देशमुखांनी सांगितलं होतं. विष्णू चाटेचा फोन ठेवल्यानंतर संतोष देशमुखांनी वैभवीला एक वाक्य म्हटलं होतं. माझे काही बरे वाईट झाले तर आई, विराजची काळजी घे, असे संतोष देशमुख म्हणाले होते, असे वैभवी देशमुखने म्हटले होते.
आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
यानंतर वैभवी देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आज पप्पा आमच्यात नाहीत, फार दुःख वाटतं. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येत आहे. आज पप्पा कुठे दिसत नाहीत. मोर्चामध्ये देखील दिसले नाहीत ते इथे लोक भेटायला येतात, त्यांच्यामध्ये ते दिसत नाहीत तुम्ही जे नाही यासाठी कॉल उचलले आहे. त्याच्यासोबत आम्ही सर्व लोक आहोत असं तुम्ही सांगत आहात आम्ही यासाठी जसं लढतो तसा संपूर्ण महाराष्ट्रात देखील आमच्यासाठी लढत आहे, आरोपी सापडत नाहीत याची खंत वाटत आहे. यासाठी जे उचल पाऊल आहे ते उचलावं. सर्व महाराष्ट्राची एकच मागणी आहे की लवकरात लवकर फाशी द्यावी. यामध्ये आमचे पहिल्यापासून एकच मागणी आहे की समोर कोणी असो आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे”, असे वैभवी देशमुख म्हणाली.
