संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, आज तरी राजीनामा होणार का? अंजली दमानियांकडून पुन्हा प्रश्नांची सरबत्ती
आता संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानतंर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच आता संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानतंर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानिया या सातत्याने आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या मंत्री धनंजय मुंडेंवर विविध आरोप करताना दिसत आहेत. त्यातच आता अंजली दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले, आज तरी राजीनामा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
“आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले. आज तरी राजीनामा होणार का ?
आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला पाठवत आहे. ह्यांचा पाठिंबा जर वाल्मिक कराड ला नसता, तर ही क्रूर हत्या झाली नसती. आज तरी ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा.
अजून बरेच काही कळणे बाकी आहे….. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फ़ोन चा डेटा देखील रिट्रीव झालेला नाही. अजून का झाला नाही ? तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही? जो पर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तो पर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे”, असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे.
आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले.
आज तरी राजीनामा होणार का ?
आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक detailed पत्र, ज्या मधे, धनंजय मुंडे यांच्या वरचे सगळे आरोप, मी पुरव्या सकट, मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, CBI, CAG आणि ACB ला…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 8, 2025
खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या
दरमयान संतोष देशमुख यांची केजमध्ये 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या झाली होती. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुखांना मारण्यात आलं होतं. या हत्येविरोधात संपूर्ण महाराष्ट्राने आवाज उठवला. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. अवादा कंपनीकडून सुदर्शन घुले यांनी खंडणी मागितली होती. त्यावेळी झालेल्या वादामधूनच देशमुखांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर मकोकोअंकर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे.