Dhananjay Munde : माझा राजीनामा महत्वाचा की देशमुखांना न्याय देणं महत्वाचं ?; धनंजय मुंडेंचा खडा सवाल

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप आहे. मुंडे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय आरोपांना तीव्र शब्दांत खोडून काढले आहे. भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांना पाठिंबा दर्शवला होता.

Dhananjay Munde : माझा राजीनामा महत्वाचा की देशमुखांना न्याय देणं महत्वाचं ?; धनंजय मुंडेंचा खडा सवाल
धनंजय मुंडे
| Updated on: Jan 31, 2025 | 1:00 PM

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडच वातावरण प्रचंड तापलं असून तिथलं राजकारणही ढवळून निघालं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. याच मुद्यावरून धनंजय मुंडेंनाही सातत्याने घेरण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. मात्र अजित पवार असोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई केली जाई. पण जिथे तथ्य नसेल तिथे कारवाईचा प्रश्न येत नाही असंही अजित पवार म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी, अजित पवार यांची भूमिका हीच अधिकृत भूमिका असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात उडी घेत त्यांना स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला.नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा इशारा दिला.

या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिकाही मांडली. गेल्या 53 दिवसांपासून माझ्यावर संकट आहे, सोशल मीडियातून टार्गेट करून मीडिया ट्रायल सुरू आहे. देशमुखांची हत्या झाली त्यातील आरोपींना फाशी द्या. फास्ट ट्रॅकवर केस आणा. जे कोणी सापडेल त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसांपासूनची भूमिका आहे. पण काही लोक त्यावरून राजकारण करत आहेत, फक्त माझा राजीनामा घेण्यासाठी राजकारण सुरू आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवून न्याय मिळवणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन, एका समाजाला, मला टार्गेट करणं महत्वाचं आहे ? असा खडा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. आपल्याला सरळसरळ टार्गेट केलं जात असल्याचा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांच्याशी सगळ्या बाबीवर हितगूज केले. याबद्दल ते स्पष्टपणे बोलले. ” इथल्या वाइब्स सकारात्मक आहेत. मी अनेक वर्षानंतर या ठिकाणी मुक्कामी आलो. आज सकाळी मला बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. मंत्री झाल्यावर भगवान गडावर आलो नव्हतो. काल रात्रीच आलो. दर्शन आणि पूजा झाली. आता दर्शन घेऊन मी मुंबईला जाणार आहे. मला सांगितलं की बाबांची मुलाखत झाली. न्यायाचार्य बाबांनी मुलाखतीत सांगितलं की हा गड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठी उभा आहे. याच्यासारखी ताकद, न्यायाचार्याचा विश्वास माझ्या मागे राहणं ही मोठी जबाबदारी आहे. हा गड गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून हा गड मोठा झाला आहे. म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हटलं जातं. आज हा गड माझ्यापाठी उभा आहे. ही माझ्यासाठी मोठी शक्ती आहे. या शक्तीचं वर्णन शब्दात सांगू शकत नाही. शक्ती उभी केली तेवढी जबाबदारीही आली आहे.” असं ते म्हणाले.

” एक लक्षात घ्या. हे संकट आज आलेलं नाही. ५३ दिवसांपासून पाहत आहात. सोशल मीडियातून टार्गेट करून मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यात कुठेही मी तीन महिन्यात एक अवाक्षर शब्द बोललो नाही. ५३ दिवसात कधीही इथे आलो असतो. पण त्या भावनेतून नाही, मंत्री झाल्यानंतर आलं पाहिजे या हेतूने आलो. बाबांसोबत या प्रकरणावर चर्चा नाही. त्यांच्याशी जी चर्चा होती ती अध्यात्मावर होती. ते ऐकल्यावर आपल्याला काही तरी मिळतं. जीवन जगण्यासाठी मंत्र मिळतो. लाखो लोकांचं जीवन सुसह्य करण्याची प्रेरणा मिळते. त्यावर चर्चा झाली.

देशमुखांच्या हत्येची केस फास्ट ट्रॅकवर आणा 

जे प्रकरण घडलं. ते ५३ दिवस सुरू आहे. यात सर्व गोष्टी आल्या आहेत. आमचंही स्पष्ट म्हणणं आहे की, देशमुखांची हत्या झाली त्यातील आरोपींना फाशी द्या. फास्ट ट्रॅकवर केस आणा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.  यात जे कोणी सापडेल त्याला शासन झालं पाहिजे. ही पहिल्या दिवसांपासूनची भूमिका आहे. ही भूमिका मांडल्यावर काही लोक राजकारण करत असतील, केवळ माझा राजीनामा घेण्यासाठी राजकारण आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फासावर लटकवण्यासाठी राजकारण आहे. एका समाजाला, मला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार आहे. पण जे कोणी दोषी असतील त्यांना फासावर लटकवा हे माझं मत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

महायुतीतील जे कोणी बोलत आहेत. तर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारा. मी त्यावर बोलणार नाही,असे म्हणत धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं.