माणसाचे हाड, रक्त…; महादेव मुंडे हत्याप्रकरणी सुरेश धसांकडून खळबळजनक आरोप
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर, भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. धस यांनी १२ गुंठ्या जमिनीसाठी ही हत्या झाल्याचा दावा केला असून, गोट्या गिते, वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावाही केला आहे.

परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांच्यावर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातच आता वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा दावा केला होता. तसेच महादेव मुंडे हत्या प्रकरणातील गोट्या गित्ते हा सायको किलर असून आमची ही हत्या करू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केले आहे.
सुरेश धस यांनी नुकतंच विधानभवनाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महादेव मुंडे प्रकरणी विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेटपणे भाष्य केले. महादेव मुंडेला फक्त १२ गुंठ्यासाठी मारलं, तो गरीब माणूस होता, असे सुरेश धस यांनी म्हटले.
फक्त १२ गुंठ्यासाठी त्याला मारलयं
“गोट्या गिते हा सायको किलर आहे. फक्त १२ गुंठ्यासाठी त्याला मारलयं. तो गरीब माणूस होता. महादेव मुंडेंच्या प्रकरणी आता माहिती येत आहे. त्यात गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगर जो आकाबरोबर असायचा त्याने मिडिया समोर हे सांगितलेले आहे. मी जेव्हा आकाला भेटायला गेलो, तेव्हा एक माणसाचं चमडं, हाडं आणि त्याचे रक्तही यांच्या ऑफिसच्या टेबलवर होते, हे बाळा बांगर बोललेत. यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्या ज्ञानेश्वरी ताईंना औषध प्यायची वेळ एसपी कार्यालयासमोर आली. मग त्यात त्या ताईंची काय चूक आहे”, असा सवाल सुरेश धस यांनी केला.
हे लोक किती वेळ आका कंपनीसाठी काम करतात
“काही दिवसांपूर्वी झालेल्या एका तारखेवेळी आकाच्या ग्रुपमधील एक मोक्का असलेला आरोपी कोर्टात येतो. बीडचे पोलीस नक्की काय कारवाई करतात. ज्ञानेश्वरी मुंडे या ताईने प्रत्येकवेळी पोलिसात जाऊन माझ्या नवऱ्याचं काय झालं, असे विचारले. २१ ऑक्टोबर २०२३ पासून ती माऊली आणि तिचा भाऊ हे दोघंच लढतात. काल त्या ताईने विष प्राशन केल्यानंतर आता पुढे तपास दिला आहे. त्यानंतर आता सांगतात की गोट्या गितेला पकडण्यासाठी पुण्याला टीम पाठवली आहे. ज्या दिवशी बाळा बांगरेने स्टेटमेंट केलं, त्या दिवशीपासून ते फरार झाले. ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही. यांचे मोबाईल चेक केले तर हे लोक किती वेळ आका कंपनीसाठी काम करतात हे समोर येईल”, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.
