
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात रान पेटले आहे. आता बीडमध्ये मोर्चा निघाला आहे. वाल्मिक कराड याला राजाश्रय असल्यानेच त्याला अटक होत नसल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. मुख्यमंत्री इतर नेते वारंवार सांगतात आम्ही नि:पक्षपणे चौकशी करू, परंतु 19 दिवसानंतर आरोपी पकडले जात नाहीत, त्यामुळे बीडच्या जनतेत उद्रेक आहे. जे आरोपी आहेत ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यांना पकडण्यात एवढी दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे. सरकारला या यापूर्वीच इशारा देण्यात आला होता की आरोपीला तात्काळ अटक करा नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असे ते म्हणाले.
वाल्मीक कराड तर कार्यकारी पालकमंत्री
यापूर्वी सुद्धा अनेकदा अजितदादांना भेटून बीडमधील सामाजिक राजकीय परिस्थिती कानावर घातली होती, असे प्रकाशदादा म्हणाले. धनंजय मुंडे राज्याचे मंत्री होते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली, त्याच्यामध्ये महत्त्वाचं नाव वाल्मीक कराडचं होतं. काही वर्तमानपत्रात वाल्मीक कराड यांना कार्यकारी पालकमंत्री असं म्हटलं आहे. इतक्या स्तरावर ही चर्चा होती, असे ते म्हणाले.
वाल्मिक कराडचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप
खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव आलं. अनेक प्रशासनातील अधिकारी सांगायला लागलेत त्यांचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप होता. कुठल्या विभागाच्या अधिकार्यांना डायरेक्ट आदेश देऊन काम करायला लावायची वाल्मीक कराडचे प्रथा परंपरा होती. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला सुद्धा खंडणीच प्रकरण कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.
आपण मध्यंतरी अजित दादांना फोन करून आरोपींना अटक होत नाही याबद्दल लोकांच्या मनात उद्रेक आहे याबाबत प्रयत्न करा अशी विनंती केली होती. वाल्मिक, धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत, त्यांनी सांगितलं आहे. चार वर्षे पालकमंत्री असताना त्यांनी पूर्ण अधिकार त्यांना दिले होते, कार्यकारी पालकमंत्री म्हणून काही वर्तमानपत्रांनी त्याचं कौतुक केलं. जे काही घडले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांची कार्यपद्धती जबाबदार आहे असं मला वाटतं, असा थेट आरोप प्रकाशदादांनी केला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.